अन्न व औषध प्रशासनाकडून मुंबई, ठाण्यातील विक्रेत्यांवर गुन्हे
औषधांची तस्करी करून ती खुल्या बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. नवी मुंबई येथील ‘रिलायन्स लाइफ सायन्सेस’ कंपनीकडून राजस्थान सरकारला पाठविण्यासाठी उत्पादित केलेले ‘इम्युनोरेल’ या नाममुद्रेचे इंजेक्शन मुंबई आणि ठाण्यात खुल्या बाजारात अवाजवी किमतीत अवैधरीत्या विक्री करणाऱ्या औषधविक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिले जाणारे(इम्युनोग्लोबीन घटक असलेले)‘इम्युनोरेल’ नामुद्रेचे इंजेक्शन ‘रिलायन्स लाइफ सायन्सेस’ कंपनी २००९ सालापासून उत्पादित करते. राजस्थान सरकारला ही इंजेक्शन कंपनीकडून पुरविली जातात. या इंजेक्शनची खुल्या बाजारात अवैधरीत्या विक्री होत असल्याची तक्रार कंपनीने राज्य अन्न व औषध प्रशासनाकडे जुलै २०१८ मध्ये केली होती. तपासामध्ये मुंबईतील काही औषध विक्रेत्यांकडे हे इंजेक्शन विक्रीस असल्याचे प्रशासनाला आढळून आले.
सरकारसाठी उत्पादित असल्याने या इंजेक्शनच्या बाटलीवर विक्री किंमत छापलेली नसते. परंतु या औषधांवरील ‘नॉट फॉर सेल’ आणि ‘राजस्थान सरकारसाठी उत्पादित’ ही दोन्ही लेबल काढून त्याऐवजी विक्री किंमत छापून यांची सर्रास विक्री सुरू असल्याचे तपासात आढळले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे आणि मुंबईतील अन्न व औषध प्रशासन याचा तपास करत होते. या औषधांच्या तस्करीच्या रॅकेटचा छडा लावण्यासाठी आर.के.किडवाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतील ११ औषध विक्रेत्यांकडे हे इंजेक्शन विक्रीस आढळली आहेत. त्यांच्या विरोधात नुकताच गुन्हा दाखल केला आहे. या विक्रेत्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानुसार औषधपुरवठा कोणाकडून केला जातो, याचा तपास केला जाईल, अशी माहिती किडवाई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
कंपनीच्या ‘इम्युनोरेल’ या नाममुद्रेच्या इंजेक्शनची अवैधरीत्या विक्री होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर जुलै २०१८ मध्ये राज्य अन्न व औषध प्रशासनाकडे कंपनीने तक्रार दाखल केली. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत कंपनीकडून केली जात असल्याचे रिलायन्स लाइफ सायन्सेस कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
सरकापर्यंत साठा पोहोचल्याची नोंद
तपासणीमध्ये कागदोपत्री औषधांचा साठा कंपनीकडून राजस्थान सरकारला प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. मात्र पुरवठादार किंवा राजस्थान सरकारच्या यंत्रणेमधून या औषधांची तस्करी केली जात असल्याचा संशय अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. इंजेक्शनच्या एका बाटलीची किंमत सुमारे १४ हजारापर्यंत आहे. विक्रीसाठी उपलब्ध नसलेल्या या औषधांची तस्करी करून मोठा नफा कमावला जात असल्याचेही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.