पावसाळा सुरु झाला की उन्हाळ्यात जमिनीखाली आश्रयाला असणाऱ्या बेडूक, साप, गोगलगाय हे प्राण्यांची रेलचेल सुरु होते. असे सरपटणारे प्राणी सध्या वडाळा (पूर्व) भागातील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या वसाहतीत दिवसाउजेडी दिसू लागल्याने रहिवाशी हवालदिल झाले आहेत.
वडाळा रोड स्थानकाला लागूनच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगार वसाहती आहेत. साधारण ३५ ते ४० इमारती तेजस नगर, सद्भावना नगर या भागात विभागल्या आहेत. पोर्ट ट्रस्टचे रुग्णालयही याच भागात असून येथूनच मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्ट ट्रस्टची रेल्वे मार्गिका हार्बर रेल्वे मार्गाला मिळते. पोर्ट ट्रस्टची रेल्वे मार्गिका असणाऱ्या यार्डातच सापांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. १० ते १५ हजार वस्ती असणाऱ्या या वसाहतीत भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडणाऱ्या सापांचे दर्शन सध्या नागरिकांना घडत आहे. पहाटे प्रभातफेरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या रहिवाशांना पहाटे घरोघरी येणारे दुधविक्रेते आणि वृत्तपत्रविक्रेते यांनाही या प्राण्याचे दर्शन घडत आहे. त्यामुळे रहिवाशांबरोबरच विक्रेतेही भीतभीतच येथे वावरताना दिसतात. वडाळा पश्चिमेला असणाऱ्या आझाद नगर भागातही सापांचे दर्शन होत आहे. झोपडपट्टी पुर्नवसन योजनेअंतर्गत येथील झोपडय़ा तोडण्यात आल्याने तिथला काही परिसर मोकळा झाला आहे. त्यामुळे सापांना मोकळा वावर मिळाला आहे. उंदीर, घरात पक्ष्यांसाठी लावण्यात आलेली कृत्रिम घरटी, रिकामे टायर यांकडे साप आकर्षित होउन त्यामध्ये आश्रयाला येतात. त्यामुळे या गोष्टी घराच्या परिसरात ठेऊ नये, असा सल्ला सर्पमित्र सुनिश कुंज यांनी दिला. सापाच्या बहुतांश जाती या बिनविषारी असल्याने घाबरण्याची काही गरज नाही. अशी पुस्ती त्यांनी जोडली.

Story img Loader