ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या तिखट वाणीसाठी आणि रोखठोक बाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याच संजय राऊत यांचं निवासस्थान मुंबईतल्या भांडुप या ठिकाणी आहे. संजय राऊत हे पत्रकारांशी कायमच चर्चा करत असतात. कधी ते कॅमेरावर उभ्यानेच बोलतात तर कधी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधतात. आज संजय राऊत यांच्या घरी एक साप आला होता. तो साप संजय राऊत यांच्या दिशेने चालला होता. सुरक्षा रक्षकांना ही माहिती मिळताच त्यांनी सापाला हुसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जात नव्हता. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आलं.
सर्पमित्र या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या सापाला पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी हा साप लपून बसला होता अशीही माहिती मिळते आहे. पाणदिवड जातीचा हा बिनविषारी साप होता. या सापला पकडल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. पत्रकार परिषदेत अचानक साप आल्याने गोंधळ उडाला होता.
नितेश राणे यांनी उडवली संजय राऊत यांची खिल्ली
दुसरीकडे भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी साप शिरल्याने त्यांची खिल्ली उडवली आहे. आता तरी माझी सुरक्षा वाढवा असं खोचक ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे आणि संजय राऊत यांना नौटंकी असं म्हटलं आहे.
आज संजय राऊत यांनी काय आरोप केला?
खासदार संजय राऊत म्हणाले, काही गुन्हेगारांना निवडणुकीपूर्वी तुरुंगातून बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून या कैद्यांशी वाटाघाटी सुरू आहेत. मी लवकरच याचे पुरावे देईन. अनेक मोठ्या गुन्हेगारांबरोबर या वाटाघाटी सुरू आहेत. निवडणुकीआधी काही कैद्यांना जामीन देऊन तुरुंगातून बाहेर काढण्याचं षडयंत्र रचलं आहे. हे षडयंत्र कोणाविरोधात आहे, याची माहिती आणि पुरावे मी लवकरच तुमच्यासमोर मांडेन.