मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील मांदिवली गावात नुकतीच बिनविषारी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या सापाची हत्या करून त्याची चित्रफित, छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. या घटनेमुळे निसर्गप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी दापोली तालुक्यामधील मांदिवली गावातील एका घरात धामण शिरला होता. त्यावेळी घरात एक वयस्कर महिला होती. प्रथमदर्शनी सापाला पाहून महिलेने घाबरून आरडाओरडा केला. त्यानंतर घरातील इतर व्यक्तींनी सापाची कुऱ्हाडीने हत्या केली आणि हत्या करतानाची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली. ही ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. विशेष म्हणजे ज्यांनी हत्या केली त्यांनीच ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. यामुळे याप्रकरणी वन्यजीवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धामण निरुपद्रवी असून, तो मुख्यतः उंदीर, बेडूक, सरडे यांचे भक्षण करून शेतकऱ्यांना मदत करतो. अशा उपयुक्त सापाची हत्या करणे ही केवळ निसर्गाशी गद्दारी नसून, वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या तरतुदींनुसार शिक्षेस पात्र गुन्हा आहे. वनविभागाला याप्रकरणी माहिती मिळाली असून यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वन्यजीव दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
धामणाची वैशिष्ट्ये
धामण अतिशय चपळ व जलद हालचाल करतो.
माणसाला शक्यतो दंश करत नाही, केला तरी बिनविषारी असल्याने धोका नसतो.
धोक्याची जाणीव झाल्यास तो फुसफुसण्याचा आवाज करतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो.
पर्यावरणातील भूमिका
धामण निसर्गातील शिकारी म्हणून महत्त्वाचा आहे.
उंदीर व तत्सम कीटक मारून पर्यावरणीय संतूलन राखतो.
त्याच्या अस्तित्वामुळे कीटकनाशकांवरील अवलंबन कमी होते.
कायदेशीर संरक्षण
वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत धामण संरक्षित आहे.
त्याला मारणे, पकडणे किंवा त्रास देणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.
धामणाबद्दलचे गैरसमज
धामण दिसायला भयावह वाटतो, पण तो पूर्णतः बिनविषारी आहे.
तो नगासारखा फणा काढतो (केवळ बचावासाठी), त्यामुळे अनेकजण चुकून त्याला विषारी समजतात.
धामणाची खास वैशिष्ट्ये
धामण हा भारतातील सर्वात वेगवान सरपटणारा साप मानला जातो. तो अत्यंत जलद हालचाल करू शकतो, त्यामुळे शिकार पकडणे सोपे होते.
धामण सहजपणे झाडांवर चढू शकतो. अनेक वेळा तो पक्ष्यांची अंडी किंवा पिल्ले खाण्यासाठी झाडांवर जातो.
धामण राग आला किंवा घाबरला की जोरात फुसफुसतो. त्यामुळे तो कोबरा असल्याचा भास होतो. पण तो फक्त इशारा असतो, हल्ला करत नाही.