रविवारच्या मेगाब्लॉकनंतर सोमवारी दिवसभर वेळापत्रकानुसार धावलेल्या मध्य रेल्वेने अखेर रात्री नांगी टाकली. रात्री उशिरा विद्याविहार स्थानकाजवळ डाउन जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक रखडली. विशेष म्हणजे या वेळी मेल-एक्सप्रेस गाडय़ांची वाहतूक जास्त असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांना त्याचा फटका बसला.
सोमवारी रात्री १०.०५च्या सुमारास मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटलेली खोपोली जलद गाडी साडेदहाच्या सुमारास विद्याविहार स्थानकाजवळून जात होती. त्या वेळी गाडीचा पेंटोग्राफ आणि ओव्हरहेड वायर यांतून ठिणग्या पडल्या आणि ओव्हरहेड वायर तुटली. ही गाडी जागच्या जागीच उभी राहिली. दिरंगाईमुळे या गाडीनंतर सुटलेली १५ डब्यांची कल्याण जलद गाडीही या गाडीमागे अडकली. परिणामी कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचा परिणाम मेल-एक्सप्रेस गाडय़ांच्या वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणात झाला.

Story img Loader