अपक्ष नगरसेवकांची दोन अतिरिक्त मते मिळवून ५६ मताधिक्याने विजयी झालेल्या शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीच्या उमेदवार स्नेहल आंबेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या. पण उपमहापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच नव्या महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि स्नेहल आंबेकर यांना पहिल्याच दिवशी डोकेदुखी झाली. निवडणूक प्रक्रियेमध्येच उद्धव ठाकरे आल्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेत सभागृहात गदारोळ केला. अखेर माजी महापौरांनी धाव घेत विरोधकांना थोपवून धरले आणि नव्या महापौरांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र विरोधकांनी उपमहापौरांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून सभात्याग केला.
महापौरपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या स्नेहल आंबेकर यांचा ५६ मताधिक्याने विजय झाला आणि महापौरपदावरून पायउतार होत सुनील प्रभू यांनी त्यांना महापौरांच्या आसनावर विराजमान केले. महापौरांच्या आसनाला वंदन करून स्नेहल आंबेकर आसनस्थ झाल्या आणि त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू केले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीची घोषणा करीत त्यांनी प्रक्रिया सुरू केली. आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी त्यांनी दोन्ही उमेदवारांना दिला. ही वेळ संपल्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पुकारण्यात आली. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकाचे वैयक्तीक मत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच नव्या महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात अवतरले. पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंतही त्यांच्या सोबत होते. शुभेच्छा देऊन उद्धव ठाकरे सभागृहाबाहेर पडल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खवळले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सदस्य नसलेल्या व्यक्तीला सभागृहात प्रवेश करता येतो का, अशी विचारणा करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी स्नेहल आंबेकर आणि चिटणीस विभागाचे प्रमुख नारायण पठाडे यांना गराडा घातला. पठाडे यांनी मौन घेतल्याने नगरसेवकांचा भडका उडाला. नवनिर्वाचित महापौर आणि चिटणीस विभागाच्या प्रमुखांनी संगनमत करून उद्धव ठाकरे यांना सभागृहात प्रवेश दिल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. माजी महापौर सुनील प्रभू आणि श्रद्धा जाधव यांनी स्नेहल आंबेकर यांच्या मदतीसाठी धाव घेतली आणि विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर स्नेहल आंबेकर यांचा निषेध करीत उपमहापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. सत्ताधारी उमदेवार अलका केरकर १२१ मते मिळवून निवडून आल्या.
‘उपमहापौरपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी’
उपमहापौर पदाची निवडणूक सुरू असताना नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या कुटुंबासह सभागृहात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक विषयक नियमांची पायमल्ली केली असून उपमहापौरपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे. या संदर्भात विधी खात्याकडून कायदेशीर मत मागवावे आणि या प्रकारास जबाबदार असलेले पालिका चिटणीस नारायण पठाडे यांची चौकशी करावी, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला मफलर परिधान करून स्नेहल आंबेकर महापौरांच्या आसनावर बसल्या होत्या. मुंबईच्या प्रथम नागरिक या नात्याने त्या कोणत्याही एका पक्षाच्या नसतात. परंतु ही अक्षम्य चूक करून त्यांनी मुंबईकरांचा अपमान केला आहे, असेही ते म्हणाले.