‘छुप गये सारे..’ या गीताने ताल धरला आणि थिरकणाऱ्या पावलानिशी दस्तुरखुद्द यजमानबाई महापौर रंगमंचावर पोहोचल्या. शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, पालिका अधिकारी-कर्मचारी, काही पत्रकार आणि निमंत्रितांच्या साक्षीने पतीसोबत नृत्याचा आनंद लुटण्यात महापौरबाई मश्गूल झाल्या खऱ्या, पण ‘कल नहीं आना, मुझे ना भूलाना, के मारेगा ताना जमाना’ अशा या गाण्यातल्या ओळी कानावर पडताच या पदन्यासावरून शेरेबाजी होऊ नये आणि राजशिष्टाचार सांभाळला जावा यासाठी सजग झालेल्या शिवसेना पदाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनाही गाणे संपताच छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यातील छायाचित्रे नष्ट करण्यासाठी वेगाने ‘पदन्यास’ करावा लागला!
दिवाळीनिमित्त महापौर स्नेहल आंबेकर यांनी बुधवारी महापौर बंगल्यामध्ये स्नेहभोजन आयोजित केले होते. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यांना या समारंभास आमंत्रित करण्यात आले होते. महापौर बंगल्यातील हिरवळीवर रंगमंच उभारून सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी आल्हाददायक वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. पालिका सभागृहात चित्रपटगीतांच्या ओळी ऐकवून नगरसेवकांमध्ये हशा पिकविणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांच्यातील संगीतप्रेम उफाळून आले आणि त्या थेट रंगमंचावर पोहोचल्या. आपल्या किणकिण्या आवाजात त्यांनी हिंदी चित्रपटातील गीत ऐकविले आणि त्यावर तालही धरला. नयना सेठ यांच्या या आविष्कारामुळे मुंबईच्या प्रथम नागरिक स्नेहल आंबेकरही भारावून गेल्या. रंगमंचावरील गायक ‘दो रास्ते’ या चित्रपटातील ‘छुप गये सारे..’ हे गीत गात असताना निवेदकाने आसनस्थ असलेल्या स्नेहल आंबेकरांनी धरलेला गीताचा ठेका पाहिला आणि त्याने त्यांना रंगमंचावर आमंत्रित केले. थिरकत्या पावलांनीच त्या रंगमंचावर पोहोचल्या. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे पतीराजही रंगमंचावर पोहोचले आणि आंबेकर दाम्पत्याने नृत्याविष्कार सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर शिवसेना पदाधिकारी आणि काही अधिकारी या नृत्याविष्काराने अवाक् झाले. महापौरांचा सपतीक नृत्याविष्काराचा समारोप होताच अधिकारी सजग झाले. पालिकेच्या छायाचित्रकाराने टिपलेली महापौरांच्या नृत्याविष्काराची छायाचित्रे तात्काळ कॅमेरातून नष्ट करण्यात आली.
कुणी बोलेना!
हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पत्रकारांसाठी आयोजित केला होता; महापौरांच्या नृत्याविष्काराच्या वेळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पत्रकार होते. मात्र हळूहळू पत्रकारांची गर्दी वाढली आणि महापौरांच्या नृत्याची सुरू असलेली चर्चा पत्रकारांच्या कानावर पडली. मात्र याविषयी पत्रकारांशी बोलायला कुणीही तयार नव्हते.
महापौरांच्या नृत्यानंतर अधिकाऱ्यांचा धास्तावलेला ‘पदन्यास’!
‘छुप गये सारे..’ या गीताने ताल धरला आणि थिरकणाऱ्या पावलानिशी दस्तुरखुद्द यजमानबाई महापौर रंगमंचावर पोहोचल्या.
First published on: 24-10-2014 at 02:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snehal ambekar dance with husband in bmc organized program