मुंबई : विमानतळ वा बंदरमार्गे होणारी अमली पदार्थांची तस्करी शोधून काढणारे `स्निफरʼ श्वान अर्थात वासाद्वारे माग काढणारे कुत्रे आता परदेशातून येणारी पार्सल तपासण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. सीमा शुल्क विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच टपाल खात्यातील परदेशांतून येणारी अमली पदार्थांची पार्सल शोधणे सोपे होणार आहे.
परदेशांतून येणारी पार्सल फोर्टमधील बॅलार्ड इस्टेट येथील मुंबई परदेशी टपाल कार्यालयात येतात. सहा प्रमुख देशांतून आलेली ही पार्सल नंतर शहरातील टपाल कार्यालयांना पाठविली जातात. या पार्सलमार्फत सध्या ‘हायड्रोपोनिक विड’ ( पाणी व कार्बनच्या सहाय्याने अफुची शेती व त्यावर प्रक्रिया करून तयार केलेला अमली पदार्थ) या अमली पदार्थांची जोरात तस्करी सुरू आहे. परदेशांतून पाठविल्या जाणाऱ्या पुस्तके वा इलेक्ट्रॅानिक वस्तू, ग्लोव्ह्ज आदी वस्तूंमध्ये लपवून अमली पदार्थ पाठविले जातात. बऱ्याच वेळा या पार्सलवरील पत्ता चुकीचा असतो. या पार्सलची तपासणी करण्यासाठी सीमा शुल्क विभागाने स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहेत.
हेही वाचा: ठाणे: नितीन कंपनी पूलाजवळ टेम्पोला अपघात; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल
मात्र मोठ्या संख्येने येणाऱ्या पार्सलची तपासणी करणे अडचणीचे ठरत आहे. या सर्व पार्सलची विमानतळावर तपासणी होते. तरीही काही वेळा काही पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची शक्यता वाटल्याने पुन्हा तपासणी केली जाते. मात्र ती चुकीची ठरली तर ज्याच्या नावे पार्सल आहे ती व्यक्ती टपाल खात्यावर दावा टाकते. हे टाळण्यासाठी अमली पदार्थ हुडकून काढणाऱ्या स्निफर श्वानाची मागणी सीम शुल्क विभागाने केली असून ती लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता परदेशी पार्सलद्वारे हड्रोपोनिक विड या अमली पदार्थाची तस्करी रोखणे शक्य होणार असल्याचा दावा या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी केला आहे.
हेही वाचा: डोंबिवली: मोठागाव ते काटई-हेदुटणे बाह्य वळण रस्त्याचे भूसंपादन रखडले?
या विडला उच्चभ्रूंच्या पार्टीत सध्या खूप मागणी आहे. कोकेनला या उच्चभ्रूंची अधिक पसंती असली तरी विड सहज उपलब्ध होत असून कोकेनपेक्षा कमी किंमत मोजावी लागत असल्याचे या सूत्रांनी सांगितले. नालासोपारा येथे या विडचे बंद काचेच्या घरात सध्या उत्पादनही सुरू झाल्याचे सांगितले जाते. ‘विड’ला भारतात अद्याप अमली पदार्थ संबोधले जात नसल्याचा फायदा उठविला जात आहे, असे या सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे उपसंचालक ग्यानेश्वर सिंग यांनीही गेल्या काही वर्षांत टपाल आणि खासगी कुरिअरमार्फत अमली पदार्थांची तस्करी वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली होती.