लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ घरांच्या (१४ भूखंडांसह) सोडतीतील विरार – बोळींजमधील २०४८ घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. अनामत रक्कमेसह अर्ज जमा करण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असून या घरांसाठी सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेसह केवळ ३२६ अर्ज जमा झाले आहेत. ही संख्या खूपच कमी असून या सोडतीतही बोळींजमधील मोठ्या संख्येने घरे रिकामी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली आहे. या घरांची विक्री करण्यासाठी इतर काही पर्याय आहेत का याची चाचपणी मंडळाने सुरू केली आहे.
विरार – बोळींजमधील मंडळाच्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पातील घरांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पुढे येथील २०४८ घरे विकली गेली नाहीत. अनेकदा सोडत काढूनही या घरांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कोकण मंडळाने आता ही घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट केली आहेत. या घरांसाठी अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. असे असताना या घरांना खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. ‘प्रथम प्रधान्य’ योजनेत उत्पन्नाचा दाखला बंधनकारक नसून अनेक अटी शिथिल आहेत. तरीही ही घरे विकली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.
सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत २०४८ घरांसाठी १४०४ इच्छुकांनी अर्ज भरला आहे. तर यातील केवळ ३२६ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज जमा केला आहे. २०४८ घरांसाठी केवळ ३२६ अर्ज सादर झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी बुधवार आणि अमानत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत आहे. असे असताना घरांना मिळालेल्या प्रतिसादामुळे मंडळाची चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आता मंडळाने या घरांच्या विक्रीसाठी अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे