जामीन मंजूर होऊनही, केवळ गरिबीमुळे तुरुंगात खितपत पडलेल्या अमृता साळवी या तरुण मातेच्या करुण कहाणीने राष्ट्रीय महिला आयोगाला अजून पाझर फुटलेला नसला, तरी समाजातील अनेक मायेचे हात तिच्यासाठी पुढे झाले आहेत. अमृता अद्याप तुरुंगातच खितपत पडून असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात दूरध्वनी करून आम्ही तिला जामीन राहण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अमृताच्या पुनर्वसनाचे आश्वासन देणारा महिला आयोग गेला कुठे, असा संतप्त सवालही अनेकांनी केला.
मालवणीत राहणाऱ्या अमृता साळवी ऊर्फ आफरीन शेख या तरुणीने परिस्थितीमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपले सव्वा महिन्याचे तान्हे बाळ विकण्याचा प्रयत्न केला होता. दलालांच्या तावडीत सापडून अमृताने हा निर्णय घेतला होता. ‘लोकसत्ता’ने हा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर पोलिसांनी दलाल आणि अमृताला अटक केली. नंतर अमृताची दु:खद कहाणी समोर आली.
दोन महिन्यांपूर्वी अमृताला जामीन मिळाला, पण २० हजार रुपयांची हमी देण्यासाठी कुणी नसल्याने ती अजूनही तुरुंगात खितपत पडली आहे. शुक्रवारी याबाबतचे वृत प्रसिद्ध होताच अनेक वाचकांनी अमृतासाठी जामीन राहण्याची तयारी दर्शवली. बोरिवलीतील एका महिला डॉक्टरांनी तिला जामीन राहण्याची तयारी दर्शवितानाच, स्वयंसेवी संस्थेत तिचे पुनर्वसन करण्याची जबाबदारीही उचलली आहे. लालबाग येथे राहणाऱ्या किशोर देसाई यांनी तर त्या संदर्भात पोलिसांशीही संपर्क साधला.
पोलीस आयुक्त जयवंत हरगुडे यांनीही यास दुजोरा दिला आहे. तिला जामीन राहण्यासाठी काही जणांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, असे त्यांनी सांगितले. सोमवारी न्यायालयात अर्ज देऊन याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Story img Loader