शहरबात : शैलजा तिवले

मुंबईत प्रतिदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख जुलैअखेरीस जवळपास ३५० पर्यंत खाली आल्यामुळे मुंबईकरांनी आणि पालिकेने काही प्रमाणात सुस्कारा सोडला. दुकानांच्या वेळांपासून निर्बंधही काही प्रमाणात शिथिल होऊ लागले आहेत. एकंदरीत यावर्षी जानेवारीत पहिली लाट ओसरताना असलेली स्थिती पुन्हा आली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांनी रुग्णसंख्या पुन्हा वाढणार यात काही दुमत नाही, परंतु पहिली लाट ओसरल्यावर पालिका आणि मुंबईकर गाफील झाल्यामुळे दुसऱ्या लाटेत जो तडाखा बसला तो आता तिसऱ्या लाटेत बसू नये यासाठी यंत्रणा आणि नागरिकही सतर्क आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत जानेवारीमध्ये प्रतिदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख ४०० च्या खाली उतरला होता. पहिली लाट ओसरल्याचे दिसून आल्यावर निर्बंध शिथिल झाल्यामुळे साहजिकच शहरांमधील गर्दी वाढत गेली. परंतु त्याचवेळी खर्चाचा भार कमी करण्यासाठी पालिकेने जम्बो करोना रुग्णालयातील मनुष्यबळ, औषध पुरवठा कमी केला. चाचण्यांचे प्रमाणही हळूहळू कमी होत गेले. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधाचे प्रमाणही कमी झाले. रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी दाखविण्यासाठी गृहविलगीकरणावर भर दिला. याचा गैरफायदा बाधितांनीही घेतला आणि ते मोकाट फिरत राहिले. एकूणच प्रतिदिन जवळपास ४०० रुग्णांची नव्याने भर पडत असूनही मात्र पालिकेने पहिली लाट ओसरलीच या भ्रमात राहून संसर्ग रोखण्याच्या सर्व उपाययोजनांमध्ये ढिलाई केली. परिणामी फेब्रुवारीअखेर पुन्हा रुग्णसंख्येने उसळी घेतली. खरेतर पहिल्या लाटेच्या अनुभवानंतर यंत्रणांनी आणखी सतर्क होणे गरजेचे होते. पहिल्या लाटेत आरोग्य व्यवस्थेपासून विभाग स्तरावर सक्षम केलेल्या यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. परंतु पालिकांनी सर्व लक्ष केवळ लसीकरणावर वळविले आणि त्या गाफील राहिल्या. पहिली लाट आपण उलटून लावली या अतिआत्मविश्वासात राहिलेल्या पालिकेने सर्व गोंधळात दुसरी लाट याहून तीव्र आली तर काय, हा साधा विचारही केला नाही आणि याचा फटका दुसऱ्या लाटेत चांगलाच बसला.

भारतात उत्परिवर्तित झालेल्या करोनाच्या डेल्टा रूपामुळे दुसरी लाट अशा वेगाने आणि तीव्रतेने पसरली की यंत्रणेची दाणादाण उडाली. पहिल्या लाटेपेक्षा रुग्णसंख्या दुपटीने वाढली आणि त्या तुलनेत पूर्वतयारी नसल्यामुळे दुसऱ्या लाटेतही पहिल्या लाटेप्रमाणे खाटा, अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांसह परिचरिकांचे मनुष्यबळ अपुरे पडले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा कोलमडून पडली आणि रुग्णांचेही हाल झाले. यावेळेस उच्च आणि मध्यमवर्गाला करोनाने विळखा घातल्याने या वर्गाला याची मोठी झळ बसली. पहिल्या लाटेच्या तुलनेत मुंबईत मृत्यू कमी झाले हीच तेवढी समाधानाची बाब.

करोनापेक्षाही घातक असलेल्या त्याच्या डेल्टा रूपामुळे  फेब्रुवारीपासून थैमान घालत असलेली दुसरी लाट अखेर सहा महिन्यांनी ओसरायला सुरुवात झाली आहे. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी र्निबधांत घट करावीच लागेल. यानंतर  वाढणारा लोकांचा वावर, परराज्यातील प्रवाशांची गर्दी यामुळे तर येत्या काळात चाचण्या वाढविण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या अधिकाधिक करून वेळीच रुग्णाचे निदान करणे गरजेचे आहे हे करोना कृती दलाने वारंवार बजावूनही मात्र मुंबईत दरदिवशी ३० हजारांखालीच चाचण्या केल्या जात आहेत. आठवडय़ातून एकदा ३५ हजारांपर्यंत हा आकडा जातो. मास्कचा वापर, गर्दी कमी करणे, प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात असून यावरही यंत्रणांचा वचक कमी झाला आहे. बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी यांच्या संपर्कातील आठपेक्षाही कमी जणांचा शोध दरदिवशी घेतला जात आहे. एकूणच खुले झाल्यावर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ नये यासाठी मात्र पालिका सज्ज झाल्याचे दिसत नाही. मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली येथेही थोडय़ाफार फरकाने अशीच परिस्थिती असल्याचे दिसते आहे.

खाटा वाढविण्यासाठी आणखी जम्बो रुग्णालये उभारून खासगीच्या गळ्यात टाकून मुंबई पालिकेने हात वर केले आहेत. दुसऱ्या लाटेत एकीकडे लसीकरण आणि उपचार अशी दोन्ही यंत्रणा सांभाळताना आरोग्यव्यवस्थेची चांगलीच तारांबळ उडाली होती. तेव्हा आता अचानक रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मोठय़ा संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी किंवा उपलब्ध मनुष्यबळाची क्षमता वाढविण्यासाठी मात्र पालिकेने प्रयत्न केलेले नाहीत. दुसऱ्या लाटेत मध्य आणि उच्च वर्गात करोनाचा प्रसार अधिक आणि पहिल्या लाटेत बाधित आलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या प्रतिपिंडांचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे तिसऱ्या लाटेत पुन्हा झोपडपट्टय़ांमध्ये प्रसार वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तेव्हा या भागांमध्ये मात्र त्यादृष्टीने नियोजन अजून पालिकेने सुरू केलेले नाही. याउलट सर्व यंत्रणा लसीकरणाच्या मागे लागलेल्या आहेत.

मुंबई महानगर प्रदेशाबाबत बोलायचे झाले तर दुसऱ्या लाटेत तेथे मोठी परवड झाली असून इथल्या नागरिकांना मुंबईत धाव घ्यावी लागली. परंतु यानंतरही राज्य सरकारने या छोटय़ा नगरपालिकांच्या आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी खंबीर पावले उचललेली नाहीत. त्यामुळे तिसरी लाट तीव्रतेने आली तर पुन्हा येथील आरोग्य यंत्रणा कोलमडणार आणि मुंबईवरील भार वाढणार हे स्पष्ट दिसत आहे.

वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या डेल्टाचे संकट आता जगभरात पसरत आहे. लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग होण्याचा धोका असून यांच्यामार्फत हा विषाणू पसरू शकतो असे नुकतेच अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्याकडे ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण मोठय़ा प्रमाणात झाले असले तरी विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांनीही प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यकच आहे. लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहेच. परंतु लसीकरण झाले म्हणून संसर्ग प्रसार वाढणार नाही असे ही समजूत ब्रिटनमधील वाढत्या करोनानंतर बदलणे गरजेचे आहे.

पहिल्या लाटेनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळल्यास आणि आतापासूनच यंत्रणा सतर्कतेने कार्यरत राहिल्यास तिसऱ्या लाटेचे भय नक्कीच कमी होईल.

Story img Loader