देशभरात गुजरात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. यावेळी गुजरात निवडणुकीत आपनेही ताकद लावली आहे. मात्र, या प्रचारात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि त्यांच्या नर्मदा बचाव आंदोलनावर थेट पंतप्रधान मोदींपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आरोपांचा सपाटा लावला आहे. भाजपाकडून मेधा पाटकर यांच्यावर गुजरातविरोधी असल्याचा आरोप करताना काँग्रेस आणि आपलाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर मेधा पाटकर यांनी भाजपाच्या या आरोपांना प्रत्युत्तर देत सरदार सरोवरबाबत सरकारने केलेले अनेक दावे खोडून काढले. त्या सोमवारी (२८ नोव्हेंबर) मुंबईतील मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या सुनिती सुलभा रघुनाथ आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे नुरजी वसावे हेही उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेधा पाटकर म्हणाल्या, “आम्हाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली कारण नर्मदा बचाव आंदोलनाविषयी जो खोटा प्रचार सुरू आहे त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. अन्यथा आम्ही पक्षीय राजकारणात नाही. मी कोणत्याही पक्षाची सदस्य नाही. निवडणुकीच्या राजकारणात सध्या मुल्यहिनता आली आहे. मतपेटीसाठी चुकीच्या गोष्टींचा आधार घेतला जात आहे.त्यात काही माध्यमांचाही समावेश आहे. ते सर्व वास्तव आम्हाला माहिती आहे.”

“संपूर्ण देशाची दिशाभूल करण्याचं षडयंत्र सुरू”

“केवळ मतदारांनाच नाही, तर संपूर्ण देशाची दिशाभूल करण्याचं षडयंत्र सुरू आहे. हे सर्व विकासाच्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे देशातील विस्थापितांसाठी आणि वंचित, शोषित,पीडितांसाठी अहिंसक सत्याग्रही संघर्ष करण्यासाठी जनतेपर्यंत सत्य पोहचवणं गरजेचं आहे,” असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं.

“पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेत्यांची झोप उडाली आहे का?”

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेत्यांकडून नर्मदा बचाव आंदोलावर होणाऱ्या टीकेला मेधा पाटकर यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “आज नर्मदाचा मुद्दा इतका मोठा का झाला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मोदी सरकारमधील सर्व मंत्री इतके का घाबरले आहेत? सरदार सरोवराचं काम आणि आमच्या कामामुळे त्यांची झोप उडाली आहे का? पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, रुपाला, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल लोकांना आमच्याच नावाने आवाहन करत म्हणत आहेत की, काँग्रेस किंवा आपला मतदान देऊ नका.”

“नर्मदा प्रकल्पाबाबत गुजरातच्या जनतेला दिलेली आश्वासनं खोटी ठरली”

“त्यांच्या आपआपसातील भांडणात आम्हाला अडकवण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे नर्मदा प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने गुजरातच्या जनतेला दिलेली आश्वासनं खोटी ठरली आहेत. त्यामुळे जनता भाजपाला मतं देणार नाही अशी त्यांना भीती आहे. अशा स्थितीत बोट वाकडं करून मतं मिळवण्यासाठी पैसा, सत्ता अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. असं असताना ते नर्मदा प्रकल्पावरच सर्वाधिक वक्तव्ये करत आहेत,” असं मत मेधा पाटकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : “राहुल गांधी गुजरातविरोधी”, ‘भारत जोडो’ यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल

“…म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सरदार सरोवराचं काम चार वर्षे बंद ठेवलं”

मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, “निवडणूक नसतानाही आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत. सरकारच्या चुका आणि चुकीच्या शपथपत्रांमुळेच सर्वोच्च न्यायालयाने सरदार सरोवराचं काम चार वर्षे बंद ठेवलं होतं. मागील ३७ वर्षांच्या सरदार सरोवराच्या घटनाक्रमावरून हेच स्पष्ट झालं आहे. आम्ही मुंबईत १८ दिवसांचं उपोषण केलं, दिल्लीत २१ दिवसांचं, भोपाळमध्ये २६ दिवस उपोषण केलं. आम्ही नर्मदा खोऱ्यातील सहकाऱ्यांसोबतच उपोषण केलं. त्या संघर्षामुळेच विस्थापितांना काही ना काही मिळालं.”

“आंदोलनामुळेच आज जवळपास ५० हजार कुटुंबांचं पुनर्वसन”

“नर्मदा बचाव आंदोलनाच्या संघर्षामुळेच आज जवळपास ५० हजार कुटुंबांचं पुनर्वसन झालं आहे. जर संघर्ष केला असता तर हे पुनर्वसनही झालं नसतं. हे अनेक अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्रीही मान्य करतात. सरदार सरोवराच्या लाभाचं आणि पुनर्वसनाचं आजचं चित्र पाहणं गरजेचं आहे. सरदार सरोवरामुळे १८ लाख हेक्टर जमीन सिंचित होणे अपेक्षित होते. नुकताच एक व्हिडीओ समोर आला त्यात २४ लाख हेक्टर जमीन सिंचित झाल्याचा दावा करण्यात आला,” असा आरोप मेधा पाटकर यांनी केला.

हेही वाचा : नर्मदा जीवनशाळेसाठी जमा झालेल्या निधीचा खरंच गैरवापर झाला? शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा अहवाल आला समोर

“२०१७ पर्यंत २२ हजार ६०० किलोमीटर पाट निर्मितीचं काम बाकी होतं”

त्या म्हणाल्या, “यातील सर्वाधिक सिंचन कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये होणार होतं. त्यासाठी तिथं पाट निर्माण होणं गरजेचं होतं. मुख्य पाट आणि उपपाट असे चार पाट निर्माण करून हे पाणी शेतांमध्ये नेणं आवश्यक होतं. त्याशिवाय शेतात पाणी पोहचणं शक्यच नाही. आज कच्छमध्ये असे पाट तयारच करण्यात आलेले नाहीत. भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुरेश नेताजी यांचा २०१७ मधील एक लेख आहे. त्यात कॅगचा दाखला देत त्यांनी २०१७ पर्यंत २२ हजार ६०० किलोमीटर पाट निर्मितीचं काम बाकी होतं, असं म्हटलंय.”

“छोटे पाट नसल्याने शेतांना पाणी मिळालंच नाही”

“गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांमध्ये वाद असल्याने लवादाच्या निर्णयानंतर १९८९ मध्ये सरदार सरोवराला मंजुरी मिळाली. त्यानंतर आजपर्यंत शेतात पाणी नेण्यासाठी हजारो किलोमीटर पाटाच्या निर्मितीचं काम झालेलंच नाही. आम्ही कधीही कच्छला पाणी देण्यापासून रोखलं नाही.रुपाला जेव्हा स्वतः गुजरातचे पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांचंच विधान आलं होतं की, आधी ‘एक्स्प्रेस कॅनोल’ तयार करा, मग छोटे पाट तयार करा. त्यावेळी आम्ही तत्काळ त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे कच्छपर्यंत पाणी पोहचलं, मात्र छोटे पाट नसल्याने शेतांना पाणी मिळालंच नाही,” असा आरोप मेधा पाटकरांनी केला.

“सरदार सरोवरचं पाणी अदानींच्या चार बंदरांना मिळालं”

“कच्छपर्यंत पोहचलेलं पाणी अदानींच्या चार बंदरांना, जिंदालला, सेझला, फॉर्चुन या अदानींच्या खाद्यतेल कंपनी, काही उद्योग आणि काही शहरांना मिळालं. मात्र, हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचलंच नाही. नुकतीच गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होताना पंतप्रधान मोदींनी कच्छच्या मुळ पाटाचा उपपाट असलेल्या मांडवी उपपाटाचं उद्घाटन केलं. त्यामुळे आता तरी शेतांपर्यंत पाणी येईल, असं लोकांना वाटलं. मात्र, २४ तासात तो पाट तुटला,” असंही त्यांनी नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : मोदींसमोर गुजरात मुख्यमंत्र्यांकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप, मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

“खोटे आकडे सांगत गुजरातला हिरवंगार केल्याचा दावा”

“सौराष्ट्रातही छोटे पाट तयार करताना हेच पाहायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांना मुख्य पाटातून शेतात पाणी आणण्यासाठी स्वतःच्या खर्चाने डिझेल पंप लावून पाणी आणावं लागतं. काही शेतकऱ्यांनी सांगितलं की महिन्याला यासाठी ९,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. काही शेतकऱ्यांना पाटातून पाणी उचलून काही अंतरावरील तलावांमध्ये हे पाणी साठवावं लागतं. हे सर्व पाटबंधारे सिंचन नाही. गुजरातचे नेते हेच खोटे आकडे पुढे करत गुजरातला हिरवंगार केलं आहे, असे फसवे दावे करत आहेत,” असा हल्लाबोल मेधा पाटकर यांनी भाजपा नेत्यांवर केला.