दोन दशकांपूर्वी ठाणे महापालिकेतर्फे कार्यरत झालेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या दारूण अवस्थेविरूद्ध दाद मागण्यासाठी शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत़ मंगळवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला. तसेच आयुक्तांना या विषयी निवेदनही दिले. आठ दिवसात रुग्णालयातील आरोग्यसुविधा पूर्ववत करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल़े
शहरातील नितीन देशपांडे, सत्यजीत शहा, नीलेश आंबेकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या आठवडय़ात या रुग्णालयाची पाहणी केली. त्यात हे रुग्णालयच आजारी असल्याचे निदर्शनास आले. या रुग्णालयातील ट्रॉमा केअर कक्ष बंद आहे. न्यूरोसर्जन आणि हृदयरोगतज्ज्ञ नाही. रुग्णालयातील औषधांचे दुकान बंद आहे. पातळ औषध घेण्यास रुग्णालयाच्या आवारातील एका बुथवरून पाच रूपयांची बाटली विकत घ्यावी लागते. पूर्णवेळ भूलतज्ज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया करण्यास अडचणी येतात. सध्या एकच सोनोग्राफी यंत्र सुरू आहे. तसेच रुग्णालयात सलाईनची बाटलीच काय पण इंजेक्शनची सुईही उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव या पाहणीतून उघड झाले आहे.
येथील बाह्यरुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारांसाठी येतात. पालिकेच्या अर्थसंकल्पात या रुग्णालयासाठी ५० कोटी तर औषध खरेदीसाठी सव्वा दोन कोटी रुपयांची तरतूद आहे. रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र जळाल्यानंतर आयुक्तांनी तातडीने यंत्र खरेदी करा, असे आदेश देऊनही त्याची कार्यवाही झालेली नाही.
लोकप्रतिनिधींनाही कानपिचक्या
क्षुल्लक राजकीय डावपेचांसाठी रस्त्यावर उतरणारे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाबाबत उदासीन का आहेत, असा सवालही सामाजिक कार्यकर्त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा