आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी ‘सी व्हिजील अ‍ॅप’; निवडणूक आयुक्तांची घोषणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणूक काळात समाजमाध्यमांवर (सोशल मीडीया) निवडणूक आयोगाचे नियंत्रण राहणार असून त्यावर केलेला प्रचाराचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरण्यात येईल. त्यादृष्टीने जिल्हा व राज्यस्तरीय समित्यांमध्ये समाजमाध्यम तज्ज्ञांचा समावेश करण्याचे आदेश देण्यात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी सांगितले. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहिता भंगाच्या व भरमसाठ निवडणूक खर्चाबाबतच्या तक्रारी कोणालाही करता याव्यात, यासाठी निवडणुकीची घोषणा झाल्यावर ‘सी व्हिजील अ‍ॅप‘ सुरु करण्यात येणार असल्याची आणि राज्यात सर्व ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट जोडण्यात आल्याची माहिती लवासा यांनी दिली. निवडणुकीपूर्वी ४८ तास प्रचार शांततेच्या काळात वृत्तपत्रातील व समाजमाध्यमांमधील जाहिराती व प्रचारालाही प्रतिबंध घालण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायद्यात आवश्यक ती सुधारणा करण्याची शिफारस आयोगाने केंद्र सरकारला केली असल्याचेही लवासा यांनी सांगितले.

प्रसिध्दीमाध्यमांमध्ये उमेदवारांना झुकते माप देऊन करण्यात येणारे वृत्तांकन हे ‘पेड न्यूज‘ समजण्यात यावे, जाहिराती व जाहिरात फलकांचे महागडे दर लहान पक्षांना परवडणारे नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व उमेदवारांना समान धर्तीवर जाहिरात फलकांच्या जागा सवलतीच्या दराने उपलब्ध करुन द्याव्यात, उद्योगांकडून राजकीय पक्षांना देणग्या आयोगामार्फत सर्वाना वितरित व्हाव्यात, आदी अनेक मागण्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे केल्या.

निवडणूक आयुक्त लवासा आणि सुशील चंद्र यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तयारीचा आढावा दोन दिवस घेतला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही आयुक्तांनी चर्चा केली. याविषयी लवासा यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी व्हिजील अ‍ॅपवर करण्यात आल्यावर त्याची तात्काळ दखल घेऊन १०० तासांच्या आता योग्य ती कार्यवाही होईल व त्याची माहिती अ‍ॅपवर टाकली जाईल, असे लवासा यांनी सांगितले. पक्ष व इतरांच्या ऑनलाईन तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समाधान अ‍ॅप आणि निवडणूक विषयक सर्व परवानग्या एक खिडकी योजनेमार्फत देण्यासाठी सुविधा अ‍ॅप सुरु करण्यात येत असल्याचे लवासा यांनी नमूद केले.

मतदारयादीतील घोळाबाबत तक्रारी आल्याने पुन्हा छाननी केली जाणार असून ज्यांची नावे मतदारयादीत नाहीत, त्यांना २ व ३ मार्च रोजी होणाऱ्या विशेष मोहीमेत ती समाविष्ट करण्याची संधी पुन्हा दिली जाणार आहे. पात्र मतदार यादीतून वगळला जाऊ नये, याची खबरदारी घेतली जाईल, असे लवासा यांनी स्पष्ट केले. राज्यातील निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

  • राज्यातील एकूण मतदार – ८,७३,३०,४८४ (पुरुष – ४,५७,०२,५७९, महिला – ४,१६,२५,८१९, तृतीयपंथी – २०८६, मतदान केंद्रे – ९५४७३