‘शिक्षकांचे शिक्षण’ या परिसंवादातील वक्त्यांचा सूर
काही चुकले की त्याला जबाबदार धरण्यासाठी कोणीतरी हवे असते. तसे आज शिक्षकांच्या बाबतीत झाले असून शिक्षण, अध्यापन, अभ्यास, विद्यार्थ्यांची प्रगती, अधोगती या साऱ्याच बाबतीत फक्त शिक्षकांनाच जबाबदार धरले जात आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची चर्चा होत आहे. पण शिक्षकांच्या शिक्षणापेक्षाही या बाबतीत सर्व समाजाचेच शिक्षण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमातील ‘शिक्षकांचे प्रशिक्षण’ या विषयावरील परिसंवादत बोलताना सर्वच वक्त्यांनी केले.
या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात या सत्राने झाली. या परिसंवादात ‘प्रथम’ संस्थेच्या मुंबई पश्चिम विभाग संस्थापक उषा राणे, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्टचे संस्थापक व संचालक नीलेश निमकर, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे प्रशिक्षक नरेंद्र देशमुख, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशनच्या माजी संचालिका सुमन करंदीकर हे वक्ते सहभागी झाले होते. ‘लोकसत्ता-पुणे’च्या प्रतिनिधी रसिका मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्रातील शिक्षण आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती याविषयी बोलताना उषा राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ५८ टक्के मुलांना इयत्ता दुसरीच्या स्तरावरील पुस्तकांचे वाचन करता येत नाही, तर २२ टक्के विद्यार्थी गणितातील साधा भागाकारही करू शकत नाहीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आपण जेव्हा शिक्षकांकडे बोट दाखवितो, तेव्हा उरलेली चार बोटे आपल्या स्वत:कडे म्हणजे पालक, समाज, राज्य शासन, शैक्षणिक धोरण ठरविणारी मंडळी याकडेही असते हे विसरून चालणार नाही.
शिक्षकांचेही वाचन कमी झाले असल्याचे सांगून राणे म्हणाल्या की, पाठय़पुस्तके वगळता त्यापलीकडे शिक्षकांकडून अवांतर वाचनच होत नाही. शिक्षकांना प्रशिक्षित करायचे असेल तर नेमकी उद्दिष्टे अगोदर ठरवून घ्यावी लागतील. त्यात सर्वसामान्य पालक आणि समाजालाही सहभागी करून घ्यावे लागेल. शिक्षकांची गुणवत्ता वाढवायची असेल तर त्यांच्याबरोबरीनेच समाजाचेही शिक्षण केले पाहिजे.
प्रशिक्षित शिक्षकांची संख्या गरजेपेक्षा जास्त
नीलेश निमकर यांनी या वेळी बोलताना एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात प्रशिक्षित शिक्षकांची संख्या गरजेपेक्षा जास्त झाली आहे. यंदाच्या वर्षी ‘डीएड’च्या ६५ हजार जागांसाठी फक्त ६ हजार अर्ज दाखल झाले. ग्रामीण भागातून ‘डीएड’साठी मोठय़ा प्रमाणात जी मंडळी येत होती, ते प्रमाण कमी का झाले? की आपण गरजेपेक्षा जास्त जागा निर्माण केल्यामुळे हे घडले? शिक्षणाच्या बाबतीत आपण अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले असून त्या पाश्र्वभूमीवर शिक्षकांचे शिक्षण यावर विचार झाला पाहिजे.
आपल्याकडील शाळांची एकूणच परिस्थिती आणि आपल्याला कशा प्रकारचे शिक्षण हवे आहे, त्यावर आता काम करण्याची गरज आहे. आपण एकूणच प्राथमिक शिक्षणाबाबत फारसे गंभीर नाही. शिक्षकाकडे केवळ तंत्रज्ञ म्हणून नव्हे तर एक व्यावसायिक म्हणून पाहणार आहोत का, असा सवाल उपस्थित करून निमकर यांनी सांगितले की, एकूणच या विषयातील वास्तवता आणि धोरणे यातील असलेले अंतर मिटविण्याची आज खरी गरज आहे.
साह्य़भूत यंत्रणा उभारणे गरजेचे
शिक्षकांचे शिक्षण करायचे असेल तर नव्या बदलांचे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवले गेले पाहिजे. त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना प्रशिक्षित केले गेले पाहिजे. शिक्षकांना त्यांचे विचार मुक्तपणे मांडण्यासाठी संधी दिली गेली पाहिजे. बदल घडवून आणायचा असेल तर टीका होऊ नये. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, मराठी विज्ञान परिषद, उपक्रमशील संस्था यांनी एकत्र येऊन शिक्षकांच्या शिक्षणासाठी साह्य़भूत ठरेल अशी एक यंत्रणा (सपोìटग सिस्टीम) कायमस्वरूपी उभारावी, असे मत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे प्रशिक्षक नरेंद्र देशमुख यांनी या वेळी व्यक्त केले.
शिक्षण महाविद्यालये सक्षम असावीत
आज आपल्याकडे शिक्षण महाविद्यालये उदंड प्रमाणात झाली आहेत. शिक्षण क्षेत्राच्या धोरणाचा तो एक भाग झाला. मात्र, धोरणे राबवण्यापेक्षा त्यांचे योग्य प्रकारे पर्यवेक्षण (मॉनिटिरग) होणे आज महत्त्वाचे आहे. शिक्षण महाविद्यालये समाजासमोरील प्रश्न समजून घेऊन त्यावरील उत्तरे शोधण्याइतपत सक्षम असली पाहिजेत. ही महाविद्यालये आणि प्रशिक्षक जोवर आत्मपरीक्षण करून जबाबदाऱ्या ओळखत नाहीत, तोवर शिक्षकांचे प्रशिक्षण होणार नाही, असे परखड मत पुण्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशनच्या माजी संचालिका सुमन करंदीकर यांनी व्यक्त केले.
दबावाला बळी पडून कोणतेही बेकायदा काम करू नका
सत्रानंतर झालेली प्रश्नोत्तरेही चांगलीच रंगली. संस्थाचालकांच्या दबावाला बळी पडून शिक्षकाने त्याला सांगितलेले कोणतेही बेकायदा काम करू नये आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन सुमन करंदीकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केले.
संस्थाचालकांच्या दबावाला काही शिक्षक बळी पडतात त्यावर उपाय काय, या प्रश्नावर करंदीकर म्हणाल्या की, संस्थाचालकाने एखाद्या शिक्षकाला कोणतेही नको ते किंवा बेकायदा काम करण्यास सांगितले तर शिक्षकाने पहिल्यांदा त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवून ते काम करण्यास नकार दिला पाहिजे. कारण एकदा का असे बेकायदा काम करण्यास तुम्ही होकार दिलात तर तुम्ही संस्थाचालकांच्या दावणीला बांधले जाता. तुम्ही तडजोडी करायला लागलात की आपली नैतिकता, मूल्ये त्या मागोमाग फरपटत जातात. शिक्षकांच्या बाजूनेही कायदा आहे. पण त्यासाठी तुम्ही स्वत: ठाम राहिले पाहिजे.
शिक्षकांच्या ‘ज्ञानाची’ तपासणी करण्यासाठी आणखी कोणत्या नव्या यंत्रणेची भर नको, कारण त्यातून नवीन अडचणी निर्माण होतील. त्यापेक्षा प्रत्येक शिक्षकानेच आपल्या ज्ञानाची पातळी वाढविण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करावेत, असे मत एका प्रश्नाच्या उत्तरात वक्त्यांनी मांडले.
शिक्षक होण्यासाठी मुळातूनच शिकवण्याची आवड अंगी असणे गरजेचे आहे. आवडच नसेल तर शिकवणारा आणि शिकणारा दोन्हीही समरस होऊन शिकतच नाही. शिक्षण महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात असलेली चर्चा पद्धतीचे (डिस्कशन मेथड) प्रशिक्षण दिले जाते खरे, मात्र शिक्षक प्रशिक्षक आणि भावी शिक्षक यांच्यात चर्चाच होत नाही, याची खंत एका उत्तरात व्यक्त झाली.
शिक्षकांनीही वेळोवेळी आपल्या कारकिर्दीचे परखड मूल्यमापन करण्याची सवय स्वत:ला लावून घ्यावी. याने स्वत:तील गुणदोष ओळखून त्यावर मात करता येते व त्याचा अंतिम फायदा उद्याच्या नागरिकांना अर्थात विद्यार्थ्यांनाच होतो. असा एकंदर मतप्रवाह या प्रश्नोत्तराच्या वेळी व्यक्त करण्यात आला.
..तर बहुआयामी व्यक्तिमत्त्व नक्कीच
अभ्यासक्रमातील बदल वगरेसंदर्भातील सर्व माहिती शिक्षकांना योग्य वेळी दिली गेली पाहिजे. शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीसाठी तसेच त्यांचे संबंधित विषयातील ज्ञान, माहिती अद्ययावत होण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले गेले पाहिजे. ज्ञानरचनावादाची बांधणी शिक्षकांकडून झाली पाहिजे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी शैक्षणिक क्षेत्रांकडेही वळले पाहिजे. शिक्षक-विद्यार्थी, शिक्षक-शिक्षक, शिक्षक-संशोधक, शिक्षक-शैक्षणिक संस्था अथवा उपक्रमशील संस्था अशी आंतरक्रिया झाल्यास शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व नक्कीच बहुआयामी होईल.
– नरेंद्र देशमुख
सामाजिक नियंत्रण आवश्यकच
शिक्षक-प्रशिक्षकाची नोकरी मिळाली की आत्मसंतुष्टता येते. ही आत्मसंतुष्टता धोकादायक आहे. शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या प्रक्रियेत प्रशिक्षकच मागे पडला तर शिक्षकही तसेच निर्माण होतील. यासाठी सामाजिक नियंत्रणाची गरज आहे. शिक्षण महाविद्यालये, मंडळे, संस्था यांचे कार्य नीट चालू आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी तसेच उपक्रमशील संस्थांनी एकत्रितपणे पुढे येण्याची गरज आहे. त्यांचा धाक या संस्थांवर असला पाहिजे. तरच शिक्षक प्रशिक्षकांचे काम चोखपणे होईल.
– सुमन करंदीकर
‘चांगला शिक्षक’ असण्याला अन्य पर्याय नाही
शाळा कशी आहे, त्याची इमारत चकचकीत आहे का, तेथे असलेल्या विविध सुविधा, शैक्षणिक आणि अन्य वातावरण या गोष्टींना महत्त्व आहेच. पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्व आहे ते या शाळेत चांगला शिक्षक आहे की नाही त्याला. कारण बाकी सर्व उत्तम आहे, पण चांगला शिक्षकच नसेल तर विद्यार्थी, त्यांची शैक्षणिक आणि एकूणच प्रगती होण्यास मर्यादा येतील. त्यामुळे चांगल्या शिक्षकाला अन्य पर्याय असूच शकत नाही.
– नीलेश निमकर
शिक्षकांनीही ज्ञानाची पातळी वाढवावी
काही अपवाद वगळता शिक्षकांचे अवांतर वाचन कमी झालेले आहे किंवा अजिबातच नाही, असे चित्र पाहायला मिळते. पाठय़पुस्तकांखेरीज शिक्षकांनी अवांतर वाचन करून आपली ज्ञानाची पातळी वाढविली पाहिजे. नाहीतर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार?
उषा राणे