लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यात पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवत असताना, सकाळी ११ नंतर उष्णतेच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. याचीच प्रचीती सध्या येत असून, मंगळवारी (१८ फेब्रुवारी) अकोल्यात देशातील सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस, तर बुधवारी (१९ फेब्रुवारी) सोलापुरात ३८.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनंतपूर (रायलसीमा-आंध्र प्रदेश) आणि कलबुर्गी (कर्नाटक)नंतर सोलापुरात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान ठरले आहे.

मध्य आशियातून उत्तरेत येणाऱ्या पश्चिमी विक्षोपांचा झंझावात (थंड वारे) थंडावला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारेही कमी झाले आहेत. तसेच राज्यात हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाल्याने कमाल-किमान तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या हवामानविषयक स्थितीचा परिणाम म्हणून मंगळवारी अकोल्यात देशातील सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी सोलापुरात ३८.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. अनंतपूर (३८.६ अंश सेल्सिअस) आणि कर्नाटकातील कलबुर्गी (३८.२) खालोखाल सोलापुरात बुधवारी देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील तीन-चार दिवस तापमानात वाढ

राज्यातील कमाल तापमान सरासरी ३५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. पुढील तीन-चार दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांच्या प्रत्यावर्ती चक्रीय स्थितीमुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव तयार झाला. पर्यायाने उत्तरेतील थंड वारे, महाराष्ट्रात पोहोचलेच नाही. त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष थंडी अद्याप महाराष्ट्रात जाणवली नाही, असे मत निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.