शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कालच रात्री दहाच्या सुमारास ट्विटरवरुन नवीन गौप्यस्फोट करण्याचा इशारा राऊत यांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी आज सकाळी आठच्या सुमारास आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंट्सवरुन ५६०० कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत सोमय्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय.

संजय राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड म्हणजेच एनसएसईएलसंदर्भातील ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये सोमय्यांनी लाखो रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतल्याचा आरोप केलाय. “एनसएसईएलच्या ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ईडीने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशीसाठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले,” असा आरोप राऊत यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलाय. ट्विटरवरुनही यासंदर्भात पोस्ट शेअर करताना त्यांनी ‘किरीट का कमाल’ नावाखाली हे आरोप केलेत.

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून संशयास्पद देणग्या घेतल्याचा आरोप कालही राऊत यांनी केला होता. “पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे. त्या मेट्रो डेअरीच्या डिइन्व्हेस्टमेंट प्रक्रियेत गैरव्यवहार झालेले आहेत. त्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये देण्यात असून खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात? अशा एकूण १७२ कंपन्या आहेत.” असं राऊत यांनी म्हटलेलं तसेच यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलेलं.

“महात्मा किरीट सोमय्या जे आहेत, सतत इतरांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत असतात. धमक्या देत असतात. त्यांचं जे युवक प्रतिष्ठान आहे, त्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये संशयास्पद देणग्या कश्या येतात? देणगीच्या नावाखाली खंडणी गोळा केली जाते. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआय चौकशी आहे. कंपन्यांवर धाडी पडणार आहे किंवा पडताहेत, अशा कंपन्यांकडून हे महाशय देणग्या उचलताहेत. हा साधा सरळ प्रकार नाही. ईडी आणि सीबीआयच्या कामाची पद्धत सध्या अशी आहे की, एखाद्या मोठ्या कंपनीवर गैरव्यवहारासंबंधी धाड पडली. तर ज्या ज्या लोकांना या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ झाला आहे. त्यांची सुद्धा चौकशी होते, किंवा त्यांना सुद्धा अटक केली जाते. नवाब मलिक यांचं प्रकरण असंच आहे. आमचीही अशीच चौकशी झालेली आहे.” असं खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधताना मंगळवारी म्हटलं होतं.

Story img Loader