आपल्या भागात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, असे प्रत्येक मंत्र्याला वा नेत्याला वाटू लागल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावांनी वैद्यकीय शिक्षण खात्याची कपाटे भरू लागली आहेत. सरकार बदलले की जुने प्रस्ताव बासनात ठेवून नवीन प्रस्ताव आणले जात असले, तरी या महाविद्यालयांमध्ये शिकविण्यासाठी पुरेसे प्राध्यापक आहेत की नाही, याचा साधा विचारही होत नसल्याने, वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबा होणार, अशी भीती या क्षेत्रात व्यक्त होत आहे. सध्या राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांची डझनावारी पदे रिक्त आहेत, तर हंगामी पद्धतीने वैद्यकीय शिक्षणाचा गाडा हाकला जात असताना काही मंत्री आपल्या जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरूकरण्यासाठी घाईवर आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. रुग्णांच्या हालाला पारावार नाही. बहुतेक महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अध्यापक शिकविण्याचे आव्हान पेलत असताना, नेत्यांच्या मनमानीमुळे बदलीची टांगती तलवार कायम असते. नव्या सरकारने चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयाचा चंग बांधला आहे, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना त्यांच्या बोरिवली मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे आहे. आहे त्या शासकीय महाविद्यालयांचा फाटका-तुटका चेहरा ठीकठाक करण्यासाठी निधी द्यायचा नाही. सिटी स्कॅनसारख्या उपकरणांची दुरुस्ती न करणे, वैद्यकीय संचालकांना पुरेसे अधिकारही न देणे, अशा धोरणांमुळे वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असताना, नव्या सरकारमधील मंत्र्यांनाही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे डोहाळे लागल्याचे ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा