मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बहुचर्चित त्रैवार्षिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं. आज (२० ऑक्टोबर रोजी) पार पडत असलेल्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वानखेडे मैदानावरील गरवारे क्लब येते हे तिन्ही नेते सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच एकत्र आले. या कार्यक्रमाचा राजकारणाशी काहीही थेट संबंध नव्हता तरी या मंचावरुन मुख्यमंत्री शिंदेंनी सूचक वक्तव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला.

नक्की वाचा >> “माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…”

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांनी या कार्यक्रमामध्ये छोटेखानी भाषणं केली. या भाषणांदरम्यान तिन्ही नेत्यांनी तुफान शाब्दिक चौकार, षटकार लगावत उपस्थितांची दाद मिळवली. मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता आपल्या भाषणामधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला. ‘मी आणि फडणवीस एकत्र आहोत. आम्हाला थोडी थोडी बॅटींग येते’ असं शिंदेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. पुढे बोलताना शिंदेंनी, ‘आम्ही तीन महिन्यांपूर्वी थोडीशी बॅटींग केली’ असं म्हणत सत्तासंघर्षाचा संदर्भ दिला. यावर बाजूलाच बसलेल्या शरद पवारांनी संधी मिळाली तर कॅचही घेतात अशा आशयाचं विधान केलं अन् शिंदेंनाही हसू आलं. शिंदेंनी लगेच आम्ही सर्वांच्या आशीर्वादाने ही मॅच जिंकली असं म्हणत टाळ्या मिळवल्या.

“पवारसाहेबांचा जन्म साताऱ्याचा आहे. माझाही जन्म साताऱ्याचा आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी सांगितलं ते आम्हाला करावच लागेल,” असं मुख्यमंत्री शिंदे भाषणामध्ये म्हणाले. त्यानंतर आपल्या डावीकडे बसलेल्या फडणवीसांकडे पाहत, “इकडून आता नागपूर कनेक्शन पण आलेलं आहे,” असं हसत म्हटलं. पवार यांनी यापूर्वीच्या निवडणुकीच्या अनुभवावरुन आपलं पॅनेल जिंकेल असा विश्वास व्यक्त केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये नमूद केलं.

पाहा व्हिडीओ –

तसेच, ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची झोप उडू शकते’ असं विधान शिंदेंनी आपल्या भाषणात केलं. “पवारसाहेब आपण जे म्हणालात त्याने मला आनंद झालेला आहे. माझ्या बाजूला देवेंद्रजी आहेत त्यांनाही आनंद झाला आहे. तिकडे आशिष (शेलार) आहे त्यालाही आनंद झाला आहे. पण काही लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काही लोकांची झोप उडू शकते ना पवारसाहेबांच्या वक्तव्यामुळे,” असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलं.

Story img Loader