मुंबई : विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी, या अनुषंगाने राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून होणार असल्याचे जाहीर सुद्धा करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू होऊन आठवडा होत आला तरी या निर्णयाला मुंबईतील काही शाळांनी बगल दिल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग दुपारच्या सत्रात दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत भरतात. तर काही खासगी शाळांचे वर्ग हे सकाळी ७ ते ७.३० यादरम्यान भरतात. मात्र, सकाळी लवकर शाळा भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याचा मुद्दा राज्यपाल रमेश बैस यांनी उपस्थित केला होता आणि शाळेची वेळ बदलण्याची सूचनाही केली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरवण्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी शासन निर्णय प्रसिद्ध केला. मात्र, या निर्णयाचे अनेक शाळा पालन करत नसल्याचे राज्यासह मुंबईत निदर्शनास आले आहे. मुंबईतील काही शाळांनी शासन निर्णयानुसार वेळेत बदल केला आहे. मुंबईतील एका शाळेने पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दुपारी १ ते सायंकाळी ६ आणि पूर्व प्राथमिकचे वर्ग सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान भरवण्याचा निर्णय घेतला आहे, जे यापूर्वी सकाळी ८ वाजता भरत होते. तसेच, शासन निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांना वेळेच्या नियोजनाबाबत आदेश दिल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
हेही वाचा…अकरावी प्रवेश प्रक्रिया : उद्यापासून कोटांतर्गत प्रवेशासाठी पर्याय नोंदवता येणार
दरम्यान, स्कूल ॲण्ड कंपनी बस ओनर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले की, ‘मुंबईतील बहुसंख्य शाळा या जुन्या वेळेप्रमाणे सकाळी ७ ते ७.३० या दरम्यानच भरत आहेत. त्यामुळे शालेय बसगाडयांच्या सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान मुंबईतील नागरिक कामाला जात असतात. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू केल्यास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आमचा विरोध असून सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे’.
हेही वाचा…मुंबई विमातळावरून आरोपीचे पलायन
नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांना व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास आणि या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. – सुनील सावंत, सहाय्यक शिक्षण संचालक, मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालय