लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः दारू पिऊन दररोज आईसोबत वाद घालणाऱ्या ६० वर्षीय पित्याची मुलाने चाकूने हल्ला करून हत्या केल्याचा प्रकार चेंबूर आरसीएफ परिसरात मंगळवारी रात्री घडली. हत्येनंतर मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चेंबूर येथील आरसीएफ परिसरात श्रीनिवास गौडा (६०) पत्नी सुमित्रादेवी आणि मुलगा सुनील (४२) यांच्यासोबत राहत होते. श्रीनिवास यांना मद्याचे व्यसन होते. मद्यधुंद अवस्थेत ते वारंवार पत्नीसोबत भांडण करीत होते. या प्रकारामुळे संतापलेल्या सुनीलने मंगळवारी रात्री वडिलांवर चाकुने हल्ला केला. त्यानंतर सुनीलने पोलीस ठाणे गाठून आपण पित्यावर चाकूने वार केल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात उपस्थित पोलिसांनी तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मोबाइल व्हॅन मागवून घेतली. घटनास्थळी एक ६० वर्षांची जखमी व्यक्ती पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
आणखी वाचा- मुंबई: पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर विकास प्राधिकरणांना मुदतवाढ
याप्रकरणी सुनीलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील श्रीनिवास दररोज दारू पिऊन आईसोबत वाद घालत होते. त्या वादाला कंटाळून त्याने मंगळवारी रात्री पित्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात श्रीनिवासच्या छातीवर गंभीर जखमा झाल्या. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी श्रीनिवासची आई सुमित्रादेवी यांच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.