‘फेसबुक’चा गैरवापर होत असल्याच्या घटना ताज्या असताना माहिममधल्या एका शाळकरी विद्यार्थ्यांने ‘फेसबुक’वरून आपल्या वडिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पोलिसांकडून मदत मिळत नसल्याने या मुलाने सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना ‘फेसबुक’वर गाठून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला.
माहिमच्या गिरगावकर वाडीत संतोष नाई आपल्या कुटुंबासह राहतात. नाई यांचा स्थानिक विकासकाबरोबर जागेवरून वाद होता. त्यावादातून नाई यांना धमक्या मिळत होत्या आणि नोव्हेंबर महिन्यात गुंडाकडून मारहाणही झाली होती. पोलिसांकडे गेल्यावरही त्यांना सहकार्य मिळत नव्हते आणि मुख्य आरोपीवर कारवाई होत नव्हती. यामुळे संतोष नाई हतबल आणि निराश झाले होते. त्यांचे कुटुंबीयसुद्धा गुंडांच्या त्रासामुळे भयभीत झाले होते.
आपल्या वडिलांची ही अगतिकता त्यांचा ८ वीत शिकणारा १४ वर्षांचा मुलगा किरण याला अस्वस्थ करायची. त्याने वडिलांवर होत असलेला अन्याय ‘फेसबुक’वर मांडला. बारवर बेधडक कारवाई करणारे वसंत ढोबळे नावाचे अधिकाऱ्याचे नाव तो ऐकून होता. त्याने ढोबळेंना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून मदत मागितली. ढोबळे यांना या मुलाच्या संदेशाला प्रतिसाद देत ‘फेसबुक’वरुनच विचारपूस केली. हा प्रकार वडिलांना कळताच त्यांना मुलाचे कौतुकही वाटले आणि धीरही आला.
आपला मुलगा आपल्यासाठी लढतोय मग आपण हिंमत का सोडतोय, असा विचार करुन त्यांच्या मनाने उभारी घेतली. त्यांनी परिमंडळ ५ चे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांची मुलासह भेट घेऊन प्रकार कानावर घातला. कुलकर्णी यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत कारवाईचे आदेश दिले. माझ्या मुलाने मला हिंमत मिळवून दिली, म्हणून मी मोठय़ा हिंमतीने लढतोय..आणि आता मला पुर्ण न्याय मिळेल असा विश्वास संतोष नाई यांनी व्यक्त कला. मी फेसबुकवरून माझ्या अनेक मित्रांना या प्रकाराबद्दल सांगितले. ढोबळे सरांनी मला प्रतिसाद देत आमची समस्या ऐकून घेतली..ही आमच्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट असल्याचे किरणने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा