एकतर्फी प्रेमातून झालेल्या भांडणातून एका तरूणाने आपल्याच आईला मारहाण करत गावठी कट्टयातून गोळीबार केला. सुजित पटेल (२७) असे या तरुणाचे नाव असून त्याला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.
बोरीवलीच्या एक्सर रोडवरील धर्माजी ठाकूर पार्कमध्ये पहिल्या मजल्यावर सुजित पटेल हा आई सुधा पटेल (५६) यांच्यासमवेत राहतो. चालक असलेल्या सुजितचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. या तरुणीचे सुजितच्याच एका मित्राशी प्रेमसंबध होते. त्यामुळे ती तरुणी सुजितला दाद देत नव्हती. पण सुजित तिला प्रेमाची मागणी करून त्रास देत होता. या तरुणीने बोरिवली पोलीस ठाण्यात सुजितविरोधात तक्रारही दिली होती. त्यामुळे सुजित चिडला होता.
या प्रकरणात आईने त्या तरुणीविरोधात तक्रार करावी आणि मध्यस्थी करावी असा हट्ट सुजितने धरला होता. पंधरा दिवसांपूर्वी सुजित घर सोडून गेला होता. बुधवारी संध्याकाळी तो मद्यपान करून घरी आला. याच मुद्दय़ावरून त्याचे आईशी भांडण झाले. त्याने दार बंद करून आईला मारहाण केली. शिवाय आपल्याकडील गावठी कट्टयाने जमिनीवर एक गोळी झाडली. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलीस अग्निशमन दलासह घटनास्थळी गेले. सुजितला अटक करून त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि सात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याने हा गावठी कट्टा कुठून आणला त्याचा पोलीस तपास करत आहेत

Story img Loader