मुंबई : ऑपेरा हाऊस येथील पंचरत्न इमारतीमधील ५७ वर्षीय हिरे व्यापाऱ्याच्या कार्यालयातील तिजोरीतून तीन कोटी रुपयांचे हिरे चोरीला गेले असून याप्रकरणी सीसी टीव्हीची तपासणी केली असता चोर दुसरा-तिसरा कोणी नसून व्यापाऱ्याचा मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (डी.बी. मार्ग) पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने चौकशीत दिलेल्या माहितीवरून लवकर चोरीला गेलेले हिरे हस्तगत करण्यात येतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील लोढा वर्ल्ड क्रेस्ट या इमारतीत वास्तव्यास असलेले तक्रारदार विपूल धीरजलाल जोगाणी (५७) हिऱ्यांचे प्रसिद्ध व्यापारी असून त्यांचे ऑपेरा हाऊस येथील पंचरत्न इमारतीत कार्यालय आहे. या कार्यालयातून हिऱ्यांची खरेदी-विक्री केली जाते. त्यामुळे कार्यालयात तिजोरी ठेवण्यात आली आहे. त्यात मौल्यवान हिरे ठेवण्यात येतात. पंचरत्न इमारतीत हिरे व्यापाऱ्यांची कार्यालये असल्यामुळे इमारतीत सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.
जोगाणी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते नियमित कार्यालयात जात नव्हते. त्यांच्या कार्यालयातील तिजोरीतून गुरूवारी तीन कोटी पाच लाख रुपये किमतीचे मौल्यवान हिरे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याप्रकरणी कार्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह त्यांचा मुलगा निर्मम त्यावेळी तेथे आल्याचे निदर्शनास झाले. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून सीसी टीव्ही चित्रण ताब्यात घेतले. निर्मम याने गुरूवारी रात्री ८.३० वाजता तिजोरी उघडल्याचे निष्पन्न झाले. पण चावी नसताना निर्ममने तिजोरी उघडली कशी, याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
वडिलांच्या नकळत साबणाच्या वडीवर तिजोरीच्या चावीचा छाप घेऊन एक बनावट चावी बनवल्याचे त्याने सांगितले. तसेच तिजोरीतील हिरे चोरल्याचेही त्याने कबुल केले. पोलिसांनी त्याला याप्रकरणी सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
त्याच बनावट चावीने २० तारखेच्या रात्री वडिलांच्या तिजोरीतून ३ कोटींचे हिरे आणि ५ लाख रुपये रोकड चोरी केली. त्यात वडिलांच्या मालकीचे दोन कोटी ३० लाखांचे हिरे, नातेवाईकांनी ठेवण्यासाठी दिलेले ७० लाख रुपयांचे हिरे, पाच लाख रोकड व कार्यालयातील सर्व माहिती असलेल्या दोन हार्ड डिस्कचा समावेश होता. त्याच्या चौकशीतून पोलिसांना हिऱ्यांबाबतची माहिती मिळाली असून लवकरच चोरीला गेलेले हिरे हस्तगत करण्यात येतील, अशा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.