मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या मराठमोळ्या दिग्दर्शकांचा बोलबाला आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या हिंदी चित्रपटाने शंभर कोटी पार झेप घेत कमाई केल्यानंतर तर ही चर्चा अधिकच वाढली आहे. आदित्यच्या ‘काकुडा’ या दुसऱ्या हिंदी विनोदी भयपटातून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही आपल्या मराठी दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे. सोनाक्षीने याआधी कधीच विनोदी भयपटात काम केले नव्हते. तिने आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट आवडल्यानेच त्याच्याबरोबर काम करायची इच्छा असलेल्या सोनाक्षीने ‘काकुडा’ चित्रपटासाठी होकार दिला.

‘काकुडा’ या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखबरोबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिने याआधी कधीही भयपटात किंवा विनोदी भयपटात काम केलेले नाही. मुळात मला भयपट पाहायलाच फारसे आवडत नाहीत. मला उलट ‘झोंंबी’ चित्रपट खूप आवडतात. त्यामुळे विनोदी भयपटात काम करणे कसे जमेल? अशीच शंका माझ्या मनात होती, असे सोनाक्षीने सांगितले. त्यात ‘झोंबीं’चे कथानक असलेला आदित्यचा ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट तिने पाहिला. मला ‘झोंबिवली’ चित्रपट खूप आवडला होता. त्यामुळे आदित्यच्या दिग्दर्शनाखाली काम करायची इच्छा होतीच. मी ‘काकुडा’ची कथा वाचली. ती वाचतानाच मला खूप मजा वाटत होती. भयपटाला विनोदाची जोड देत ती कथा रंगवली होती. हा प्रकार नवीन असल्याने मला त्यात रस वाटला. सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आल्या आणि म्हणून मी ‘काकुडा’ चित्रपटासाठी होकार दिला, असे तिने सांगितले.

हेही वाचा – हिमोफिलियाच्या औषधाअभावी रुग्णांचे हाल! राज्यात साडेपाच हजार रुग्ण…

हेही वाचा – मुंबई : धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर

यहाँ पर भूत है…

‘काकुडा’ या चित्रपटात सोनाक्षीने इंदिरा या नवविवाहित तरुणीची भूमिका केली आहे. इंदिरा आणि माझ्यात एक गोष्ट जुळून येत होती. ती म्हणजे आम्ही दोघीही भूतांना घाबरत नाही. भूतबित काही प्रत्यक्षात नसतात यावर आमचा ठाम विश्वास आहे. पण चित्रपटात इतका ठाम विश्वास असलेली इंदिरा अशा विचित्र परिस्थितीत सापडते की तिला भूतावर विश्वास ठेवण्यावाचून आणि आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यावाचून दुसरा पर्यायच उरत नाही. तिची व्यक्तिरेखा आणि हे परस्परविरोधी कथानक असल्याने इंदिराची भूमिका करताना अधिक गंमत आली, असे तिने सांगितले. चित्रीकरण करतानाही भीती वगैरे कधी वाटली नाही, पण काही प्रसंगांसाठी आम्ही अगदी मध्यरात्रीच्या सुमारास भर शेतांमध्ये चित्रीकरण करत होतो. तिथली शांतता नाही म्हटले तरी अंगावर काटा आणणारी होती. त्या भयाण शांततेत चित्रीकरणादरम्यान रितेश देशमुख, साकिब सालेम आणि आसिफ हे माझे सहकलाकार मधून मधून इथे भूत आहे… म्हणत किस्से, विनोद करत सेटवर इतरांनाही घाबरवायचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे एकाच वेळी भीती आणि मजा अशा दोन्ही भावना अनुभवत आम्ही हे चित्रीकरण पूर्ण केले, अशी गंमतही सोनाक्षीने सांगितली.