प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटातील पहिले गाणे ‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आहे असून लोकप्रिय गायक सोनू निगम यांनी हे गाणे गायले आहे.

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील ‘पांडुरंग’ हे भक्तीगीत सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले हे गाणे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून प्रसाद मदपुवार यांनी लिहिले आहे. ‘पांडुरंग’ हे माझे पहिले वारीवरचे गाणे आहे आणि या गाण्याचा एक भाग होऊ शकलो याचा मला आनंद वाटतो. जेव्हा रोहन-रोहन यांनी स्टुडिओत मला हे गाणे ऐकवले, तेव्हा या गाण्यातील खरे भाव काय आहेत हे मला समजावून सांगा, असं मी त्यांना सांगितलं होतं. कारण या गाण्यात काही पारंपरिक शब्द आहेत, जे माझ्यासाठी नवीन होते. विठ्ठलाला अर्पण केलेले माझे हे भावपूर्ण गाणे श्रोत्यांच्या हृदयालाही स्पर्श करेल, असा विश्वास सोनू निगम यांनी व्यक्त केला.

तर या गाण्यासाठी सोनू निगम हीच आमची पहिली पसंती होती, असे सांगत त्यांच्याबरोबर हे गाणे ध्वनीमुद्रित करण्याची प्रक्रियाच आमच्यासाठी अद्भुत होती, अशी भावना संगीतकार रोहन – रोहन यांनी व्यक्त केली. युनिव्हर्सल म्युझिक इंडियाद्वारे वितरित केले जाणारे हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.