मुंबई : टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कीर्तनकारांवर आधारित कथाबाह्य कार्यक्रम (रिऍलिटी शो) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी सहभागी होत युवा कीर्तनकारांना प्रोत्साहन दिले. तसेच कीर्तनात तल्लीन होत महाराष्ट्राचा डीएनए हा कीर्तनाचा आहे, असे आवर्जून नमूद केले. हा भाग शनिवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाला विचारवंत, लेखक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा नवाकोरा कार्यक्रम १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आणि वीणेच्या रूपातील चांदीच्या आकर्षक सन्मानचिन्हाचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे नुकतेच करण्यात आले होते. त्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी सहभागी होत युवा कीर्तनकारांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘फुटो हे मस्तक तुटो हे शरीर। परी नामाचा गजर सोडू नको रे ।। असे सांगत तरडे यांनी सहभागी कीर्तनकारांचे कौतुक केले.

‘कीर्तनकारांचे सादरीकरण मला थक्क करणारे असून मराठी मातीशी, संस्कृतीशी आणि मराठी मनाशी थेट जोडणारा हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीने आणल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले, पण या मंचावर उपस्थित राहण्याची संधी सोनी मराठी वाहिनीने मला दिली हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराने माझे आई-वडीलही नक्कीच सुखावले असणार. आज आपल्याला समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. हा कार्यक्रम सर्वांना निश्चितच आवडणारा आहे. हा कार्यक्रम अखंड चालू राहून अनेक पर्व व्हायला हवीत’, असे म्हणत तरडे यांनी युवा कीर्तनकारांना शुभेच्छा दिल्या.

नेमका काय आहे कार्यक्रम?

महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून एकूण १०८ कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीने शोधून आणले आहेत. प्रत्येक भागात त्यापैकी ३ कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर करीत आहेत. या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठी वाहिनीने दोन दिग्गज कीर्तनकार व परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील व ह.भ.प. राधाताई सानप यांच्यावर सोपविली आहे.