दक्षिण मुंबईतील पाच महत्वाच्या जंक्शनवर या महिन्याच्या सुरूवातीपासून वाहतूक पोलिस ‘ई-पावती’ यंत्र बाळगणार आहेत. त्यामुळे यापुढे वाहतूकीचे नियम मोडणा-या बहाद्दरांनाकडून क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे दंड वसूल करता येणार आहे. राज्यातील नऊ शहरांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठी सर्वप्रथम मुंबईची निवड करण्यात आली आहे.  
या ‘ई-पावती’ यंत्रामुळे, ड्रायव्हरने नियम मोडण्याचा प्रयत्न केल्यास वाहनचालक म्हणून त्याची मागील संपूर्ण कामगिरी आणि गाडिच्या नोंदणीची सर्व माहिती वाहतूक हवालदाराला उपलब्ध होणार आहे.
ह्या प्रकल्पाला २०१२ मध्येच सुरूवात होणार होती. मात्र यासाठी आर.टी.ओ.कडे सर्व वाहनांची संगणकीकृत नोदंणी असणे आवश्यक होते. सध्या त्यांच्याकडे मागील दहा वर्षांची माहिती जमा झाली असून, दररोज ५०० वाहनांच्या नोंदणीचे काम सुरू असल्याचे आर.टी.ओ.च्या एका अधिका-याने सांगितले.    
ही सर्व माहिती आर.टी.ओ. आणि वाहतूक विभाग पोलिस मुख्यालय यांना एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या वाहनचालकाने नियम मोडल्यास आवश्यक ती माहिती या यंत्रावर नोंदवण्यात येईल आणि यंत्र उपलब्ध माहिती स्कॅन करून नव्याने नोंदवण्यात आलेल्या माहितीसोबत जुळवण्याचा प्रयत्न करेल. आर.टी.ओ.ने अलिकडेच आम्हाला ही माहिती उपलब्ध करून दिली असल्याचे, वाहतूक पोलिस अधिका-याने सांगितले.   
हे यंत्र ‘ई-पावती’ देण्यासोबतच वाहतूक नियम मोडणा-यांची सर्व माहिती रिअल-टाईमवर अपडेट करणार आहे, असं अधिका-याने सागितले.  
यापूर्वी वाहतूक नियम मोडणा-यांना पावती देताना त्याची नोंदणी वाहतूक पोलिस अधिकारी पावती पुस्तकामध्ये करत असत. मात्र, यापुढे हे टाईप होणार असून त्याची प्रिंट घेतली जाणार आहे. यामुळे पोलिसांना लायसन्स क्रमांक, गाडिचा नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती थेट डेटाबेसमध्ये नोंदवण्यास मदत होणार आहे, असं अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक विभाग) ब्रिजेश सिंग यांनी सांगितले.       
यापुढे प्रत्येक नोंदणीकृत गाडिची माहिती ई-पावतीच्या यंत्राच्या स्क्रिनवर एका बटणावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर गाडिने याआधी किती वेळा वाहतूक नियम मोडले आहेत याची माहिती ताबडतोब उपलब्ध होणार आहे, असंही सिंग पुढे म्हणाले.

Story img Loader