मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलेट ट्रेन खाडी भाग, डोंगराळ प्रदेश, नागरी वस्तीमधून जाणार आहे. विशेषतः बुलेट ट्रेन नागरी भागातून जात असताना प्रचंड ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन आणि रुळाच्या घर्षणामुळे होणाऱ्या कर्कश आवाजाने मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या दोन्ही बाजूला ध्वनी अवरोधक बसविण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमध्ये सर्वाधिक वेगात काम झाले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत १ लाख ७५ हजारांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. एक किमी अंतरावर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला २ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>मुंबई: राजकीय फलकबाजी; गणेशोत्सव काळात न्यायालयाच्या आदेशांचा विसर

ध्वनी अवरोधक सुरत, आनंद आणि अहमदाबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत. रेल्वे पातळीपासून २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद काँक्रीटच्या पॅनेल स्वरुपात ते आहेत. प्रत्येक ध्वनी अवरोधक अंदाजे ८३०-८४० किलो वजनाचा आहे. ध्वनी अवरोधकामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound barrier on mumbai to ahmedabad bullet train route mumbai print news amy