मुंबई: गेले काही दिवस दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मध्यंतरी त्यांनी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभास यांच्या ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा भाग होत असल्याचे जाहीर करत आनंद व्यक्त केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी सध्या या चित्रपटाला ‘केएच २३३’ असे नाव देत आपण कारकिर्दितील २३३ व्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करत असल्याचे जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी कमल हसन यांच्या प्रदर्शित झालेल्या लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘विक्रम’ या चित्रपटाने चांगले यश मिळवले. आता नव्या चित्रपटासाठी त्यांनी पुन्हा एकदा तरुण दिग्दर्शकाशी हातमिळवणी केली आहे. ‘वलिमाई’ चित्रपटाचा दिग्दर्शक एच. विनोथ या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. एच. विनोथ आणि कमल हसन जोडीचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा काही प्रमाणात कमल हसन यांच्या वास्तव आयुष्यावर प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा >>> ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात फिटनेस ट्रेनरची भूमिका साकारणारा अभिनेता कोण? अभिनेते विजय चव्हाण यांच्याशी आहे खास नातं

‘रुल टू राईज’ हे घोषवाक्य असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर हातात विजेरी (टॉर्च) घेतलेल्या कमल हसन यांचे चित्र आहे. विजेरी हे त्यांनी स्थापन केलेल्या त्यांच्या मक्कल नीधी मय्यम या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळेच हा चित्रपट राजकीय नाट्यावर बेतलेला असून कुठेतरी त्याची कथा त्यांच्या वास्तव आयुष्याशी जोडलेली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. एच. विनोथ यांनी चित्रपटाची कथा कमल हसन यांनीच सुचवली असल्याचे म्हटले आहे. ६८ व्या वर्षीही अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात सक्रिय असलेले कमल हसन या २३३ व्या चित्रपटावरही थांबलेले नाहीत. त्यांच्या २३४ व्या चित्रपटाची तयारीही सुरू झाली असून प्रसिद्ध दिग्दर्शक मणी रत्नम त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actor kamal haasan 233rd film rule to rise mumbai print news ysh