मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे व्यवस्थापन मार्गदर्शक अनिल देसाई आणि तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी उत्सुक असलेले राहुल शेवाळे यांच्यात दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात थेट लढत झाली. १४ लाख ७४ हजार ४०५ मतदारांपैकी ७ लाख ९० हजार ३३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सायन कोळीवाडा, वडाळा, चेंबूर या ठिकाणी मतदारांनी तीन तासांपेक्षा जास्त काळ उन्हातान्हात उभे राहून केलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे. याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना धारावी मतदारसंघात सर्वाधिक मतदान होईल, अशी ग्वाही देणाऱ्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात एक लाख २२ हजार ८७० मतदान (४८.५२ टक्के) झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मागोवा : मराठी-मुस्लीम मतदार निर्णायक

महाविकास आघाडीसाठी ही चिंतेची बाब आहे. धारावीचे बदलते वारे पाहून शेवाळे यांनी मी पण धारावीकर मोहीम राबवली होती. वडाळा मतदारसंघात एक लाख १५ हजार ५०८ मतदान झाले आहे. पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी हवी असल्यास मतांची टक्केवारी चांगली राहील यांची काळजी आमदारांनी घेतली आहे. सायन कोळीवाडा भाजपचे आमदार कॅप्टन सेल्वन यांच्या सायन मतदारसंघात एक लाख ४२ हजार १२६ मतदान झाले आहे. जास्त झालेले मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडणार आहे. यावरून निकालाची दिशा ठरणार आहे. ठाकरे यांचे निकटवर्तीय देसाई यांच्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांनी अनेक सभा तसेच रोड शो केले. शिवसेनेसाठी महत्त्वाचा असलेला दादरचा परिसर याच मतदारसंघात येतो.

अणुशक्तीनगर, वडाळा, धारावी, चेंबूर हे विधानसभा मतदारसंघ कष्टकऱ्यांच्या वसाहती आहेत. भाजपला बहुमत मिळाल्यास संविधान बदलणार हा प्रचार या मतदारसंघातील दलित मतदारांच्या मनावर बिंबवण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला. अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक हे तटस्थ राहिल्याने येथील मुस्लीम समाजाचा कल कुठे झुकणार याची उत्सुकता आहे. माहीम मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि मनसे यांची संमिश्र ताकद आहे. मनसेचे पदाधिकारी वगळता कार्यकर्ते किती फिरले यावर महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित जुळणार आहे. माहीम मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South central mumbai lok sabha constituency review voting percentage declining in dharavi zws
Show comments