मुंबई : येत्या काही वर्षांत दक्षिण मुंबईतून सागरी किनारा मार्गावरून थेट मुलुंड, ठाणे, ऐरोलीपर्यंत जाता येणार आहे. सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा असलेला वर्सोवा ते दहिसर मार्ग हा गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह येथून थेट भाईंदरपर्यंत जाता येणार आहेच पण ठाण्यापर्यंतचा प्रवासही सुसाट होणार आहे. वर्सोवा दहिसर मार्गावर मालाड माईंडस्पेस जंक्शनपासून हा नवा जोडमार्ग (कनेक्टर) असेल.
सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. वर्सोवा-दहिसर या मार्गाचे काम सहा टप्प्यांत सुरू होणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना स्विकृतीपत्रही देण्यात आले आहे.
हेही वाचा – मुंबई : राजन साळवींच्या पत्नी-मुलाची अटकेची टांगती तलवार कायम
‘प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंक’च्या दक्षिण टोकापर्यंत सध्या सागरी किनारा मार्गाचे काम पालिकेतर्फे सुरू आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. हे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून मे २०२४ हा मार्ग पूर्णत: सुरू होईल. वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग हा प्रकल्प एमएसआरडीसी यांच्यामार्फत राबवला जाईल. त्यामुळे पालिका प्रशासनाने या मार्गाची तयारी सुरू केली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड, एस. व्ही. रोड या पूरक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. वर्सोवा ते दहिसर हा एकूण १८.४७ किमीचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे. सहा टप्प्यांसाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्याचे काम सुमारे पाच हजार कोटींचे आहे. यापैकी बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याला ४.४६ किमीचा एक उन्नत जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा – मध्य रेल्वेवर महिलांच्या डब्यांत भोंदूबाबांच्या जाहिराती चिकटवणारी टोळी सक्रिय
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याला जोडणार, शहर आणि पूर्व उपनगरही जोडणार
भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट भाईंदर पश्चिमपर्यंत जाता येणार आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा कनेक्टर तयार झाल्यानंतर थेट मुलुंड, ठाण्यापर्यंतही जाता येणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा मार्ग मिळणार आहेच, पण शहर आणि पूर्व उपनगरही जोडले जाईल.
संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ३५ हजार कोटींवर
वर्सोवा ते दहिसर या प्रकल्पाची लांबी जास्त असून कांदळवने, खाडी यासारख्या विविध भूभागातून तसेच मेट्रो कारशेडवरून हा मार्ग जाईल. अशा भूभागांवरील पूल, भूयारी मार्ग असे अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाचा खर्च ३५,९५५ कोटी इतका आहे. प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असेल. वर्सोवा ते दहिसरमधील प्रवास वेळेत ३० ते ४० मिनिटांची बचत होईल.