मुंबई : राज्यात हमीभावाने होणारी सोयाबीन खरेदी मुदत संपल्यानंतर बंद झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत. हमीभाव ४,८९२ रुपये असताना, खासगी बाजारात जेमतेम ३,९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने राज्याला १४ लाख १३ हजार २७० टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्टे होते, ते पूर्ण करण्यासाठी १२ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. पण, मुदत संपल्यानंतरही खरेदी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे राज्याच्या पणन विभागाने केलेल्या मागणीनुसार पहिल्यांदा ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. त्यानंतर पुन्हा ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. मुदतीअखेर १० लाख टन खरेदी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अद्यापही १४ लाख टनांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. लातूर जिल्ह्याला वाढीव कोटा देऊन जिल्ह्यात अद्याप सोयाबीन विक्री बाकी आहे.
दरम्यान, हमीभावाने सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये दर पडले आहेत. पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (५ फेब्रुवारी) सोयाबीनला सोलापूर, नागपूर, जालन्यात सरासरी ४०००, अकोल्यात ४०६०, अमरावती ३९७०, धुळे ३८००, लासलगावमध्ये ४०३०, बीडमध्ये ३९१२, परतूरमध्ये ३९२५ आणि पाथरीत ३८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
उत्पादनाच्या २० टक्केच खरेदी
राज्यातील खरिप हंगाम ५० लाख हेक्टरवर असून, ५२ ते ५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. सरकारने जेमतेम १० लाख टन म्हणजे उत्पादनाच्या २० टक्केच सोयाबीन खरेदी केले आहे. तसेच एकूण उत्पादनाच्या ६० टक्केच म्हणजे ३३ ते ३५ टक्केच सोयाबीन बाजारात आले आहे. त्यामुळे अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांकडे २२ ते २५ लाख टन सोयाबीन पडून आहे. त्यामुळे सोयाबीनचे करायचे काय, या चिंतेत शेतकरी आहेत. सरकारने हमीभावाने खरेदी केलेले सोयाबीन खासगी बाजारात येण्याच्या भीतीने दर पडले आहेत. त्यामुळे सरकारने खरेदी केलेले सोयाबीन पुन्हा बाजारात आणू नये. सोयाबीन प्रथिनांचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे सरकारने स्वस्त धान्य दुकानातून मानवी आहारासाठी सोयाबीनचे ग्राहकांना वितरण करावे. डाळ, तांदूळ जसे वाटले जाते, तसे सोयाबीन स्वस्त धान्य दुकानातून वितरण करावे, जेणेकरून सोयाबीनच्या दराचा प्रश्न आणखी चिघळणार नाही. दीपक चव्हाण, शेतीमाल बाजारभाव व्यवस्थेचे अभ्यासक.