लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गिरगावमधील खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्गावर मुंबई महानगरपालिकेने नवीन अभ्यासिका तयार केली आहे. नुकतेच या अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत अनेक कुटुंबे लहान आकारांच्या घरात एकत्र राहतात. त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांना अभ्यास करताना अडचणी येतात. त्यातही दक्षिण मुंबईत विशेषतः गिरगाव आणि परिसरात लहान लहान खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा व शांतता शोधावी लागते. त्यामुळे खोताची वाडी परिसरात प्रशस्त अभ्यासिका सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्ग येथे ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

ही अभ्यासिका महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत मुले आणि मुली यांचेसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. एकाचवेळी जवळपास ५० विद्यार्थ्यांना तेथे अभ्यास करता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र टेबल आहे. त्यासह स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अभ्यासासाठी पूरक वातावरण असून सीसीटीव्हीची व्यवस्था आहे. प्राथमिक स्तरावर दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत अभ्यासिका सुरू राहणार असून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येणार आहे.