मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज म्हणजेच ‘मामि’ आयोजित पंधराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ‘द बटलर’ या ली डॅनियल्स दिग्दर्शित अमेरिकन चित्रपटाने १७ ऑक्टोबर रोजी होत आहे. या महोत्सवात अफगाणिस्तानी व स्पॅनिश चित्रपटांवर विशेष प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, द. कोरिया, इटली, इराण, जपान, तैवान, जर्मनी, चीन आदी देशांतील  सुमारे २०० हून अधिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
‘फेन्ड्री’ हा नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट पदार्पणाती चित्रपट दिग्दर्शकांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात असून इंडिया गोल्ड विभागातही वैभव आबनावे दिग्दर्शित ‘मनुराग’ हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर ‘न्यू फेसेस इन इंडियन सिनेमा’ विभागात अमित मसुरकर यांचा ‘सुलेमानी कीडा’ हा चित्रपट पाहायला मिळेल. मूळचे ग्रीक परंतु फ्रेंच चित्रपटांचे दिग्दर्शक कोस्टा ग्रॅव्हॉस यांना चित्रपटांतील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असून भारतीय सिनेमांतील योगदानाबद्दल अभिनेता-दिग्दर्शक कमल हासन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, अशी घोषणा ‘मामि’चे अध्यक्ष व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी पत्रकार परिषदेतकेली.  २४ ऑक्टोबपर्यंत चालणारा हा महोत्सव आतापर्यंतचा सवरेत्कृष्ट महोत्सव ठरणार असून जगभरातील महोत्सवांमध्ये पुरस्कार विजेते ठरलेले अनेक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत, असे बेनेगल म्हणाले. यंदाचे आणखी एक खास वैशिष्टय़ पत्रकार परिषदेत सांगताना रमेश सिप्पी म्हणाले की, ‘रिस्टोर्ड फिल्म्स’ असा वेगळा विभाग असून यामध्ये ‘द फ्लोअर वॉकर’ हा चार्ली चॅप्लिन दिग्दर्शित १९३० सालातील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जतन करून तो ‘मामि’मध्ये समाविष्ट करण्यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
‘डायमेन्शन्स मुंबई’ या मुंबईवरील पाच मिनिटांच्या लघुपट विभागात यंदा सचिन कदम, ध्रुव दातार, समीर नेरकर, मकरंद सावंत, अक्षय धनावले, अभिराज राजाध्यक्ष या मराठी दिग्दर्शकांच्या लघुपटांसह एकूण २० लघुपटांची निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा