‘ये रे.. ये रे..’ असं म्हणून वरुणराजाची करुणा भाकणाऱ्या मुंबईकरांवर रविवारी पावसाने जोरदार कृपा‘वृष्टी’ केली. शनिवारी रात्रीपासूनच बरसायला सुरुवात झालेल्या मान्सूनच्या पावसाने रविवारी चांगलाच जोर पकडला आणि उकाडय़ाने त्रासलेल्या जनतेच्या उत्साहाला उधाण आलं. त्यातच समुद्राच्या भरतीमुळे हा ‘संडे मूड’ अधिकच बहरला. सालाबादप्रमाणे मुसळधार पावसात कोलमडून पडलेल्या रेल्वेच्या उपनगरी सेवेमुळे आणि पावसाच्या पहिल्याच दणक्याने रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे दरवर्षी प्रवाशांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांनाही रविवारी उधाण आले. पण पावसाच्या आनंदाने ‘न्हाऊन’ गेलेल्या मुंबईकरांनी हे हाल पचवतच पहिला ‘मान्सून रविवार’ साजरा केला. 
उपनगरात ९८ मिमी
सुटीच्या दिवशी गारवा घेऊन आलेल्या पावसामुळे मुंबईच्या तापमानात तीन ते चार अंशांची घट झाली. रविवारी दिवसभरात मुंबई शहरात ३९.३ मिमी तर उपनगरात ९८ मिमी पाऊस पडला. येत्या २४ तासांत आकाश ढगाळलेले राहील व मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
रस्ते उखडले
मुंबई महापालिकेने मे महिन्यात खड्डय़ांमध्ये भरलेली डांबरमिश्रीत खडी पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्ते खडबडीत झाले असून मुंबईकरांनी कररुपात पालिकेच्या तिजोरीत जमा केलेले लाखो रुपये ‘पाण्यात’ गेल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. खड्डे भरण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या हाती कार्यादेश पडले असले तरी त्यांनी अद्याप कामास सुरुवात केलेली नाही.  प्रशासनाची दिरंगाई आणि सत्ताधाऱ्यांची निष्काळजी यामुळे मुंबईकरांना खड्डय़ांतूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे.
रेल्वेची रखडकथा सुरू
रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन उपनगरी सेवेचा बोऱ्या वाजला. कल्याण, ठाणे, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ट्रॅकवर पाणी साचले नसतानाही लोकल जवळपास तासभर उशिराने धावत होत्या. या बिघाडामुळे दिवसभरात तब्बल २१ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे ठिकठिकाणी रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
चौपाटय़ांवर वर्षांनृत्य
मोसमातील पहिल्याच रविवारी सुट्टीचा आनंद आणखी द्विगुणीत केला आणि उत्साही मुंबईकर पाऊसधारा झेलण्यासाठी बाहेर पडला. त्यातच समुद्राला मोठी भरती असल्याने मरिन ड्राईव्ह, दादर, गिरगाव, वरळी, जुहू चौपाटी येथे मोठी गर्दी उसळली होती. तर कुठे रस्त्यावर फुटबॉल आणि क्रिकेटचा खेळ रंगला होता. वाफाळणारा चहा, गरमागरम खमंग भजी आणि बटाटा वडय़ाचा आस्वाद घेतच मुंबईकरांनी ‘पाऊसवार’ साजरा केला.

राज्यभर हजेरी मुंबईत धुवाधार
पाऊस मिमीमध्ये
रत्नागिरी ९३, अलिबाग ७१, भीरा ९१, डहाणू १२३, सांताक्रुज ८८, मुंबई-कुलाबा १८, नगर १०, जळगाव ६, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ६९, मालेगाव २५, नाशिक ६, पुणे २.२, सांगली ५, सातारा ८, औरंगाबाद १३, परभणी २, नागपूर ०.६.

पुण्यात सरीवर सरी
पुण्यात रविवारी पावसाचा जोर मंद होता तरी अधूनमधून पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पिंपरी-चिंचवड परिसरातही चांगला पाऊस झाला. सायंकाळपर्यंत पुण्यात २.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सुट्टी असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले.

नगर जिल्ह्य़ात दमदार
नगर जिल्ह्य़ात पावसाचे दमदार आगमन झाले. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात एकूण २४६ मिमी पावसाची नोंद झाली. नगर शहरासह कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यामंध्ये चांगला पाऊस झाला. पारनेर, राहाता व श्रीगोंदे तालुक्यांत मान्सूनपूर्व पावसाने अनेक तळी, तलाव भरले आहेत.  

मराठवाडय़ात रिमझिम
कन्नड तालुक्यातील इटा येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी शहरात रिमझिम पाऊस होता.  

रत्नागिरीत संततधार
रत्नागिरी शहर आणि जिल्ह्य़ात मान्सूनचा पाऊस दमदारपणे सुरू झाला आहे. सलग तीन दिवस हा पाऊस सर्वदूर पडत असून शेतीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरला आहे.

Story img Loader