मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले. तसेच हा ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या नाशिकमधील पथकाने नोंदविलेल्या सूचना व त्याअनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे. प्राधिकरण कायदा तयार करावा. मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे, अशा सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

प्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.

रस्ते मार्गांचे बळकटीकरण करा

कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे. वाहनतळांची सुविधा निर्माण करावी. भाविकांसाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. शिर्डी, छत्रपती संभाजी नगर, ओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे. ओझर विमानतळावरही अधिक विमाने उतरण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का, याचा विचार करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. नाशिक रोड, इगतपुरी, कसारा आदी स्थानकांमध्ये सोयीसुविधा निर्माण कराव्यात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

धार्मिक पर्यटनाला चालना

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतो. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे. नाशिकमधील राम काल पथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करावे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे. नाशिक व त्र्यंबकेश्वर मंदिरांच्या शेजारील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा. गर्दी, वाहतुकीचे नियोजन तसेच सर्व्हेलन्ससाठी ‘एआय’चा वापर करावा. रस्त्यांवरील गर्दीच्या नियोजनासाठी त्या ठिकाणी डिजिटल कुंभसंदर्भातील प्रदर्शन तयार करावे. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी स्पर्धा घ्यावी, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.

Story img Loader