मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवार रात्रकालीन ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या ३०० हून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी बेस्टने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवार, शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असेल. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने शुक्रवारी रात्री १०.३० ते शनिवारी सकाळी ६.३० पर्यंत, शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६.३० पर्यंत विशेष जादा बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ओशिवरा, वडाळा आणि सांताक्रूझ आगारांतून ६ विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. बेस्ट मार्ग क्रमांक ४ मर्यादित खोदादाद सर्कल – अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम) दरम्यान चार बस, बेस्ट बस मार्ग क्रमांक सी-१ सांताक्रूझ आगार -दादरदरम्यान दोन बस धावतील.
शनिवारी व रविवारी सकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत विशेष बस धावतील. ओशिवरा, वडाळा, सांताक्रूझ, वांद्रे, गोराई, गोरेगाव या आगारांतून १८ बस सोडण्यात येतील. बेस्ट मार्ग क्रमांक ४ मर्यादित खोदादाद सर्कल – अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम) दरम्यान सहा बस, बेस्ट मार्ग क्रमांक सी-१ सांताक्रूझ आगार – दादरदरम्यान तीन बस, बेस्ट मार्ग क्रमांक ८३ सांताक्रूझ आगार – कुलाबा बस स्थानकदरम्यान दोन बस, बेस्ट मार्ग क्रमांक २२५ वांद्रे स्थानक – दिंडोशीदरम्यान तीन बस, बेस्ट मार्ग क्रमांक ए-०२ गोराई – माहीमदरम्यान दोन बस, बेस्ट मार्ग क्रमांक ३३ गोरेगाव बस स्थानक – वरळी आगारदरम्यान दोन बस धावतील.
ब्लॉक नियोजन
शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पहिला ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कुठे : पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर
कधी : शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत
कुठे : पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शुक्रवारी रात्री १२.३० ते शनिवारी सकाळी ६.३० पर्यंत
शनिवार, १२ एप्रिल रोजी दुसरा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कुठे : पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ९ पर्यंत
कुठे : अप जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ८ पर्यंत