लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्राणीप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमींनी ऑस्ट्रेलियाचा ‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह याच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. अक्राळ-विक्राळ मगरी, विषारी साप यांना एकीकडे लीलया हाताळताना प्रेक्षकांशी हसतखेळत संवाद साधणाऱ्या स्टीव्हची शनिवारी ६३ वी जयंती होती.

१९९५ ते २००५ या काळात जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या आपल्या कौशल्यामुळे स्टीव्ह घराघरात ओळखीचा चेहरा झाला होता. शनिवारी त्याच्या वाढदिवसानिमित्त याच स्टीव्हला सर्व प्राणीप्रेमींनी समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या. यामुळे स्टीव्हच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आमचे बालपण समृद्ध करणारा स्टीव्ह, यु विल बी ऑलवेझ इन आवर हार्ट अशा प्रकारच्या पोस्ट, वाढदिवसाचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले‌.

स्टीव्ह इर्विन नावाने जरी तो लोकप्रिय असला तरी त्याचे खरे नाव स्टीफन रॉबर्ट इर्विन असे होते. त्याचा जन्म मेलबर्नजवळील एसिडोन या लहान उपनगरामध्ये २२ फेब्रुवारी १९६२ ला झाला होता. त्याचे वडील वन्यजीव तज्ज्ञ होते आणि त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी संबंधित हर्पेटोलॉजी विषयात विशेष स्वारस्य होते. तर आई वन्यजीव पुनर्वसन तज्ज्ञ असल्याने प्राणी प्रेमाचा वरसा त्याला घरातूनच मिळाला होता. स्टीव्हची पत्नी देखील अमेरिकन निसर्ग संवर्धन तज्ज्ञ होती.

लग्नानंतर बाहेर फिरायला गेलेले हे दोघे प्राणी प्रेमी मगरींचा पाठलाग करुन त्यांची नोंद करत होते. याच वेळेस शूट करण्यात आलेला व्हिडीओ नंतर ‘द क्रोकोडाइल हंटर’ या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचा पहिला भाग ठरला. ‘द क्रोकोडाइल हंटर’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली. ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले. या कार्यक्रमाचा शेटवचा भाग तीन तासांचा होता. यामध्ये स्टीव्ह जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी मगरींचा पाठलाग करताना दिसला. स्टीव्हच्या नावाने काही कासवांच्या प्रजातींचे नामकरण करण्यात आले आहे. यापैकी पहिली प्रजाती ठरली ती ‘एसलिया इर्विन’ . २००९ मध्ये सापडलेल्या गोगलगायीच्या नव्या प्रजातीलाही स्टीव्हचे नाव देण्यात आले.

‘द क्रोकोडाइल हंटर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टीव्हला २००६ साली स्टिंग रे माशाच्या शेपटीचा तडाखा छातीवर बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली म्हणून सिडनीतील जगप्रसिद्ध पुलावरील ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर फडकवण्यात आला. स्टीव्हला ऑस्ट्रेलियन प्राणीसंग्रहालयामध्येच स्टीव्हला दफन करण्यात आले. मात्र या प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना दफन केलेल्या ठिकाणाला भेट देता येत नाही. स्टीव्हचा मृत्यू झाला तेव्हा पंतप्रधान हॉवर्ड आणि क्विन्सलॅण्डचे प्रांताच्या प्रमुखांनी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, स्टीव्हच्या कुटुंबाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायला नकार दिला. ”मला एक सामान्य माणूस म्हणूनच वागणूक मिळावी’ अशी स्टीव्हची इच्छा असल्याने कुटुंबाने हा निर्णय घेतला.ऑस्ट्रेलियन सरकारने स्टीव्हच्या सन्मानार्थ देशातील एका प्रमुख रस्त्याला आणि जहाजाला त्याचे नाव दिले आहे.

Story img Loader