⁃ योगेश मेहेंदळे
सलग दुसऱ्यांदा पाशवी बहुमतानं मोदी सरकारला निवडून देताना मतदारांनी ‘अच्छे दिन’ आले यावर शिक्कामोर्तबच केले आहे. मुंबई परीसरातील सर्वच्या सर्व खासदार भाजपा व मित्रपक्षांचे निवडून आले आहेत. त्यामुळे या भागातील मतदार स्वर्गसुखच भोगत आहेत म्हणूनच त्यांनी या उमेदवारांना निवडलं असावं यात काही वाद नाही. तसंच, मुंबई परीसरातील तब्बल ७० लाख जनता रेल्वेप्रवास करत असल्यामुळे या लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सेवेप्रतीही मुंबईकर कृतकृत्य असतील यातही शंका असायचं काही कारण नाही. इतनाही नही, तर, मुंबईकरांवर मोदी सरकारनं रेल्वेच्या माध्यमातून ‘अच्छे दिन’चा जो काही वर्षाव केला आहे तो केवळ अतुलनीय आहे. काय आहेत या सेवा आणि का आहेत मुंबईकर प्रवासी मोदी सरकारच्या ऋणात? जाणून घेऊया…
टाइम पास
वेळ कसा घालवायचा हा मुंबईकरांसमोर यक्षप्रश्न होता. पण तो रेल्वेनं चुटकीसारखा सोडवलाय. तुम्ही डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आदी स्थानकांवर जा, एकेक तास कसा जातो कळत नाही. आणि तुम्हाला चॉईस नाही, तितका टाइमपास केल्याशिवाय माणसांचं रूप धारण केलेल्या गाडीत चढताच येत नाही. आता टाइम पास कसा करायचा या विवंचनेत असलेल्या मुंबईकरांचे तासन तास रेल्वे स्टेशनात व प्रवासातच ‘पास’ होतात.
खेळांना संजीवनी
अनेक खेळ मृतवत झाले होते. उदाहरणार्थ ल्युडो. लहानपणी व्यापार खेळावर हा खेळ फुकट मिळायचा. परंतु त्यावेळी ढुंकून न बघितलेला हा खेळ मुंबईच्या लोकल्समधला राष्ट्रीय खेळ झालाय. या खेळाचं इतकं पुनरूज्जीवन झालंय की साथीदार नसतील तर प्रवासी एकटेच चारही भिंडूचे फासे टाकतात. समोरासमोर बसलेले ल्युडो खेळत असतील नी मध्ये कुणी उभा असेल तर त्याच्या ढांगांमधून फासे टाकले जातात. फासे टाकणाऱ्याला ज्याप्रमाणे काही गैर वाटत नाही, त्याचप्रमाणे आपल्या दोन पायांमध्ये पडणारे दैवाचे फासे बघताना उभ्या प्रवाशालाही काही सोयरसुतक नसतं. ज्याप्रमाणे गर्दुल्ले त्यांची वेळ झाल्यावर इप्सित स्थळी जातात त्याप्रमाणे प्रवासी गाडीत शिरल्याशिरल्या मोबाईलवर ल्युडो काढतात. महिनाभर अजिंक्य राहणाऱ्याला रेल्वे प्रशासन फुकट प्रवासाचं बक्षीसही देणारेत म्हणे.
१२ महिने योगा डे
मोदी सरकारनं २१ जून जागतिक योगा डे केला आणि रेल्वे मंत्र्यानं तर चक्क सचिवांचा गालगुच्चाच घेतला. मोदी साहेबांची मनोकामना अशी आहे की लोकांनी योगविद्येचा अभ्यास करावा, त्यात प्रावीण्य मिळवावं. मोदीसाहेबांची ही मनोकामना लोकांच्या अंगी बाणवण्याचं हुकुमी साधन आपल्याकडे असल्याची जाणीव रेल्वेला झाली. मग भर रेल्वेगाडीत सुरू झाली विविध आसनं. उभ्या उभ्या शवासन, अर्धवक्राकृती द्विआयामी ताडासन, चतुर्थ बैठक हलासन, आवाजी वाक्ताडासन, सामूहिक मर्दनासन अशी असंख्य; पतंजलीनाही (मूळ, आधुनिक नव्हे) ठाऊक नसलेली आसनं रोज लोकलमधे घडतात नव्हे, करावीच लागतात. रोज सकाळ संध्याकाळ रेल्वेनं प्रवास करणाऱ्या व्यक्ती जर सरकारी मान्यतेच्या योग प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेशासाठी गेले, तर त्यांना थेट चौथ्या म्हणजे, योग प्राचार्याच्या परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात आली आहे, असं कुणीतरी सांगत होतं. अॅक्युप्रेशरच्या शैक्षणिक केंद्रांनीही ही सवलत द्यावी यासाठी रेल्वेमंत्री प्रयत्नशील आहेत. लोकलच्या दैनंदिन प्रवासात शरीराच्या जितक्या बिंदूंवर दाब पडतो तितका देणं कुठल्याही एका थेरपिस्टच्या कुवतीबाहेर आहे असा रेल्वेचा सार्थ दावा आहे. किंबहुना, प्रवाशांच्या कांगारू किंवा बॅगपॅकच्या चेनींच्या कडा, खिशातल्या चाव्या, टोकदार बुटांचे पॉइंट्स, छत्रीच्या काड्या, बुटक्या माणसांच्या हनुवट्या नी लंब्या प्रवाशांचे कोपरे जे काम करतात, त्याचा विचार केला तर अॅक्युप्रेशरला जोडून अॅक्युपंक्चरचीही गिनती व्हावी अशी रेल्वेमंत्र्यांची इच्छा आहे. परंतु अॅक्युपंक्चर मेड इन इंडिया नसल्याची कंडी कुणीतरी पिकवल्यामुळे ते बोलत नाहीत इतकंच!
चालण्याचा व्यायाम
लोकं चालत नाहीत, चालली तरी घरी ट्रेडमिलवर चालतात. काय हे विदेशी कंपन्यांची पोटं भरायचे उद्योग? रेल्वेनं यावर नामी तोडगा काढलाय. ते लोकल टर्मिनेट करताना स्टेशनात नाही करत. त्यामुळे लोकं रिक्षा टॅक्सी करून घरी जाण्याचा अत्यंत गंभीर धोका असतो. चालण्यामुळे ह्रदयाचा व्यायाम होतो, रक्ताचं अभिसरण होतं, मधुमेह नियंत्रणात राहतो नी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसं थकतात नी तक्रार करण्याचं त्यांच्यात त्राणंच राहत नाही. तर असा हा चालण्याचा व्यायाम लोकांना व्हावा म्हणून ट्रेन स्थानकामध्ये टर्मिनेट नाही करत. तर, दोन स्थानकांच्या मध्येच ते ही पहिल्या स्थानकापासून दहा वीस स्थानकं लांब टर्मिनेट करतात. मग जी काही लोकं ट्रॅकमधून चालतात, की क्या बात है! फेसबुकवर पोस्टच्या पोस्ट या वॉकथॉनच्या रंगतात आणि अंगठे नी लाईक्स नी कमेंट बघून रेल्वेप्रती प्रवाशांचा आदर दुणावतो. एकदा कल्याणहून निघालेली ट्रेन ठाकुर्ली स्थानकात टर्मिनेट केली नी लोकांचा हा आनंद हिरावून घेतला म्हणून संबंधिताला रेल्वेनं सस्पेंड केलं म्हणे. किमान मुंब्रा खाडीच्या पुलापर्यंत न्यायला हवी होती, त्यामुळे लोक जास्त चालले असते असा शेरा सीआर (कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट) मध्ये नोंदवण्यात आला असं रेल्वेनं सक्तीची व्हिआरएस दिलेला एकजण सांगत होता. लांब पल्ल्यांच्या गाड्यांपेक्षा उपनगरी गाड्यांना प्राधान्य द्यावं असा सल्ला दिल्याबद्दल त्याच्यावर देशद्रोहाचा ठपता ठेवला होता. परंतु, न्यायालयात तोंडघशी पडू असा सल्ला वकिलांनी दिल्यामुळे त्याची अखेर व्हिआरस देऊन बोळवण करण्यात आली. असो!
संयम व सहनशीलतेची कसोटी
संयम व सहनशीलता हे मर्यादापुरूषोत्तमाचे सद्गुण मानले जातात. आता छातीचा घेर ५६ इंच करणं काही प्रत्येकाला जमत नाही. परंतु संयम व सहनशीलता हे दोन गुण प्रवाशांमध्ये बिंबवण्यासाठी रेल्वे जे काही परीश्रम घेते त्याची दखल गिनीज बुकानंच घ्यायला हवी. प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत; हे वाक्य प्रवाशांनी जितक्या वेळा ऐकलंय, तितक्यावेळा तर थेटरातल्या डोअरकिपरनं जन गण मन पण ऐकलं नसेल. का संयमी होणार नाहीत मुंबईकर? गाडी २० मिनिटं लेट असेल तर तिला बिफोर टाइम म्हणण्याइतपत प्रगती झालीय मुंबईकर प्रवाशांची. काही काळानं असंही होईल की समजा, गाडी आलीच नाही तरीही… गाडी वेळेवर आली, ती आपण पकडली… आपण कामावर गेलो नी परत आलोपण, त्यामुळे आत्ता जे काही आपण काही तास घालवलेत स्थानकात त्यामध्ये हे सगळं झालंय इतकं मानण्याएवढी संयमी व सहनशील वृत्ती मुंबईकर प्रवाशांमध्ये लवकरच भिनेल यात मला तर किंचितही शंका नाही. काय वाट्टेल ते झालं तरी मुंबईकरांना इतकं संयमी व सहनशील करून सोडायचं की “मन की बात” त्यांना “जन की बात” वाटली पाहिजे, असा पणच रेल्वेनं सोडलाय.
ही उदाहरणं तर वानगीदाखल आहेत. याखेरीज जागेवरून आपापसात मारामाऱ्या करायला लावून त्यांना युद्धसज्ज करणं, शौचालयं मुद्दामून बकाल ठेवायची कारण समजा कल्याण-डोंबिवलीचा प्रवासी पाकिस्तानच्या तावडीत सापडलाच तर होणाऱ्या हालांसाठी सराव हा हवाच! फलाटाकडे लक्ष द्या, मोबाईल सांभाळा सारखे शिशूवर्गातल्या मुलांना लागू पडणाऱ्या निर्बुद्ध संदेशांचा भडीमार करण्यामागे देखील फार मोठा विचार आहे. तो म्हणजे तुम्हाला कधीच कुणी ब्रेनवॉश करू शकणार नाही यासाठी हे केलं जातं. समजा मुंबई महापालिकेत कामाला आहात नी, इंग्लंड अथवा अमेरिकेनं तुम्हाला किडनॅप केलं हे जाणून घेण्यासाठी की तुफान पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा कसा करतात? त्यांनी कितीही तुम्हाला ब्रेनवॉश केलं यासाठी तरी तुम्ही निश्चिंत असा कारण, फलाट आणि फूटबोर्कडमधल्या अंतराकडे लक्ष द्या म्हटल्यावर एकदम मेमरी बॅक व्हायलाच हवी. इतकंच नाही तर याउपर म्हणजे शक्य त्या प्रत्येक ठिकाणी इतकी कोंडी करायची की २००-३०० फुटांच्या खुराड्यात राहणाऱ्यांना आपलं घर म्हणजे ताज हॉटेलातला स्वीट वाटावा इथपर्यंत काळजी रेल्वे घेतेय. मायबाप मोदीसरकारचे ऋण मानण्यासाठी नी भारतीय रेल्वेच्या उपनगरीय सेवेच्या माध्यमातून लाभलेल्या या ‘अच्छे दिन’प्रती कृतकृत्य राहण्यासाठी शब्दांची कमतरता आहे. त्यामुळे २०२४ मध्ये ५४२ जागांसह तुम्हालाच निवडून देऊ याची खात्री असावी!