गोरेगाव, सिध्दार्थ नगर पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ रहिवाशांना हक्काची घरे देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने महात्त्वाचे पाऊल उचलले आहे. पात्र राहिवाशांना नवीन इमारतीत नेमकी कुठे घरे द्यायची हे निश्चित करण्यासाठी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. पात्रता निश्चितीसाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून त्यासाठी मंडळाने १८ ते २० जानेवारीदरम्यान एका शिबिराचे आयोजन केले आहे. रहिवाशांनी या शिबिराला उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा- करोनाकामांत प्रक्रियेचे पालन; पालिका आयुक्त चहल यांचा दावा, ‘ईडी’कडून चार तास चौकशी
गेली १४ वर्षे रखडलेल्या आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सिद्धार्थ नगरचा पुनर्विकास अखेर मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहे. विकासकाने अर्धवट सोडलेल्या पुनर्वसित इमारतीच्या कामाला मंडळाने सुरुवात केली आहे. शक्य तितक्या लवकर बांधकाम पूर्ण करून ६७२ राहिवाशांना घराचा ताबा देण्याचा मंडळाचा मानस आहे. दरम्यान, एकीकडे काम सुरू असताना दुसरीकडे रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना घराची हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्वसित इमारतीत कोणत्या रहिवाशाला कुठे, कोणते घर मिळणार, कितव्या मजल्यावर, कोणत्या इमारतीत हे निश्चित केले जाणार आहे. संगणकीय सोडतीच्या माध्यमातून घराची हमी दिली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास इमारतीचे काम झाल्याबरोबर ताबा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता पात्रता निश्चिती सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा- विश्लेषण: महालक्ष्मी रेसकोर्सचा वाद आहे तरी काय?
पात्रता निश्चिती जलद गतीने करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यापूर्वी २६ ते २९ डिसेंबर, २०२२ दरम्यान ६७२ राहिवाशांपैकी ४३० राहिवाशांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेतली आहे. आता उर्वरित राहिवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी म्हाडा मुख्यालयात दोन दिवसाचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. येत्या १९ आणि २०जानेवारी रोजी म्हाडा मुख्यालयातील उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई यांच्या कार्यालयात मूळ आधारकार्ड, त्याची स्वस्वाक्षरीत छायांकित प्रत तसेच पॅनकार्ड, इतर विहित कागदपत्रांसहित सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत शिबिरास उपस्थित राहून पात्रता पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन उपनिबंधक आदिनाथ दगडे यांनी केले आहे.