मुंबई : गोरेगाव येथील सिद्धार्थनगरमधील (पत्राचाळ) सदनिकांच्या हस्तांतरण-नियमितीकरणासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ ते ३० सप्टेंबर या कालावधीदरम्यान विशेष मोहीम राबवून हस्तांतरण-नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासंबंधीची जाहिरात मुंबई मंडळाने प्रसिद्ध केली असून याद्वारे सदनिकाधारकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा <<< ‘जॉन्सन बेबी पावडर’चा परवाना कायमचा रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले ‘हे’ कारण
सिद्धार्थनगरचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाकडून मार्गी लावण्यात येत आहे. २००८ पासून पुनर्विकास रखडला असून ६७२ रहिवाशांना आजही हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. या कालावधीत सदनिकांचे हस्तांतरण-नियमितीकरण झालेले नाही. त्यामुळे मुंबई मंडळाने यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकारच्या आपले सरकार या संकेतस्थळावर आवश्यक ती कागदपत्रे अर्जासह जमा करावी आणि या अर्जाची प्रत म्हाडा भवनाच्या मित्र कक्षाकडे सादर करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.