मुंबई : मुंबईतील शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेची व्यापक मोहीम पार पाडल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पूर्व आणि पश्चिम महामार्गांची व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. १७ ते २२ मार्च या कालावधीत रोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये २५ टन राडारोडा, ४ टन कचरा आणि ५.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

मुंबईतील मुख्य रस्ते, गल्लीबोळ, रुग्णालये, अन्य सार्वजनिक ठिकाणे तसेच वर्दळीच्या ठिकाणी उत्तम दर्जाची स्वच्छता राहावी, या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा ध्यास घेऊन विविध उपक्रम राबविले जात आहेत. सखोल स्वच्छता, स्वच्छता हीच सेवा, कचरामुक्त तास आदी स्वच्छताविषयक अभियान यशस्वीपणे राबविल्यानंतर आता प्रशासनाने अन्य सार्वजनिक ठिकाणीही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर, १७ ते २२ मार्च २०२५ या कालावधीत रोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ दरम्यान मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

या विशेष स्वच्छता मोहीमेची सुरुवात सोमवारी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथून तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे येथून झाली. मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स, लिटर पिकर्स, मिस्टिंग यंत्र, डंपर आणि पाण्याचे टँकर्स अशा एकूण १६ यांत्रिक स्वच्छता संयंत्रांचा या मोहिमेत समावेश होता. या मोहिमेअंतर्गत, महामार्गाच्या ठिकाणी सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आदी परिसर स्वच्छ करण्यात येत आहेत. धूळ निर्मूलनासाठी यांत्रिक झाडू संयंत्रे (मेकॅनिकल स्पीकिंग मशीन) तसेच स्वच्छतेसाठी जेटींग, प्रेशर वॉशर यासारख्या संयंत्राचा वापर केला जात आहे.

तसेच रस्त्यावरील वाहतुकीसाठीची सांकेतिक चिन्हे, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांचीही स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरूस्ती केली जात आहे. द्रुतगती महामार्गालगतच्या कचरा पेट्यांमधील कचरा आणि संकलित केलेला राडारोडा वाहून नेणे, रोपे आणि झाडांभोवतीच्या कुंपणाचा कचरा काढणे, झाडांच्या बुंध्यांची रंगरंगोटी करणे, बस थांब्यावरील आसन व्यवस्था नीट करणे, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, सार्वजनिक परिसरातील कचरा पेट्यांची स्वच्छता, तसेच गरजेनुसार दुरुस्ती करणे, सार्वजनिक प्रसाधनगृह परिसरात नियमित स्वच्छता करणे, रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या जुन्या वाहनांचीही विल्हेवाट लावणे आदी नियोजन देखील या मोहिमेत केले आहे. पदपथांचे पेव्हर ब्लॉक, दुभाजकांची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे, अनधिकृत फलक, जाहिरात फलक (होर्डिंग) आदी निष्कासित करणे, या बाबींचा देखील मोहिमेत समावेश आहे.

एका दिवसात १६ किलोमीटर परिसराची स्वच्छता

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी (१७ मार्च रात्री १० पासून १८ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत) दोन्ही महामार्गांवर मिळून एकूण १६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. चेंबूर, विद्याविहार, कुर्ला या विभागातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील एकूण ८.८ किलोमीटर, तर एच पूर्व आणि के पूर्व विभागातून जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एकूण ७.८ किलोमीटर अशी मिळून एकूण १६.३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पहिल्या दिवशी स्वच्छता करण्यात आली.

पाच दिवसात टप्प्याटप्प्याने स्वच्छता

या मोहिमेअंतर्गत घाटकोपर – विक्रोळी व अंधेरी – कांदिवली ९० फूट मार्ग, विक्रोळी – मुलुंड चेक नाका व ९० फूट मार्ग कांदिवली – दहिसर चेक नाका, शीव – घाटकोपर व वांद्रे – अंधेरी, घाटकोपर – विक्रोळी व अंधेरी – कांदिवली ९० फूट मार्ग तसेच विक्रोळी – मुलुंड चेक नाका व ९० फूट मार्ग कांदिवली – दहिसर चेक नाका या परिसरातून जाणाऱ्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, तसेच त्यांना जोडणाऱ्या रस्ते परिसराची स्वच्छता टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले.