मुंबई : जीवाला धोका असल्याने आपल्याला तळोजा करागृहातून अन्यत्र हलवू नये, अशी मागणी करणारा मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड अबू सालेम याचा विशेष न्यायालयात मंगळवारी फेटाळला. विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी सालेम याचा हा अर्ज फेटाळून लावला. त्याचवेळी, ३ जुलैपर्यंत सालेमला अन्य कारागृहात हलविण्यात येऊ नये, असे आदेश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले.
हेही वाचा : जलवहन क्षमतेत पुन्हा वाढ? अंधेरी सबवे नाल्याचे नव्याने काम होणार असल्याने खर्चवाढीची शक्यता
तळोजा मध्यवर्ती कारागृहात सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कारागृहातील अतिसुरक्षित अंडा सेलच्या दुरुस्तीचे काम आवश्यक असून दुरुस्तीदरम्यान अंडा सेलमधील आरोपींना इतरत्र हलवण्याची गरज असल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, सालेमच्या जीवला धोका असून याआधीही त्याच्यावर दोनवेळा हल्ला झाल्याकडे सालेमच्या वकिलांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. तसेच, सालेमची रवानगी अन्य तुरुंगात करू नये, अशी मागणीही केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सालेमच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. विशेष न्यायालयाने मंगळवारी सालेमच्या अर्जावर निर्णय देताना तो फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.