मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद, त्यांच्याशी संबंधित किश कॉर्पोरेट सव्र्हिसेस कंपनी आणि कंपनीच्या आणखी तीन अधिकाऱ्यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने नुकतेच समन्स बजावून ६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. कंपनी आणि कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून ती सादर केल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट होत असल्याची टिप्पणीही न्यायालयाने समन्स बजावताना केली.
या प्रकरणी कंपनी कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. किश कॉर्पोरेट सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसह त्याचे अतिरिक्त संचालक साईप्रसाद पेडणेकर, संचालक शैला गवस, प्रशांत गवस आणि अतिरिक्त संचालक गिरीश रेवणकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी कंपनी उपनिबंधकांनी तक्रार केली आहे. त्यानुसार, किश कॉर्पोरेट सव्र्हिसेस आणि अन्य आरोपींनी कंपनीच्या नोंदणीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला, त्यानंतर मालकाच्या खोटय़ा स्वाक्षऱ्या करून नोंदणीकृत कार्यालयही बदलल्याची तक्रार आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपींकडून याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. मार्च २०२२ मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायद्यांतर्गत कंपनी आणि संचालकांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली.