मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ‘कोविड लस अमृत महोत्सवा’ला मुंबईत अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. ७५ दिवसांसाठी असलेला हा महोत्सव ३० सप्टेंबरला संपला असून या काळात केवळ साडेचार लाख नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली. एकूण ७८ लाख पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ५.२६ टक्के आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘करोना लस अमृतमहोत्सव’ देशभरात साजरा करण्यात आला. मुंबईतही १५ जुलैपासून हा कार्यक्रम सुरू झाला. यामध्ये १८ वर्षांवरील ज्या पात्र लाभार्थ्यांनी करोना लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ६ महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झालेले आहेत, त्यांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) विनामूल्य दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मुंबईतही लसीकरण केंद्रावर सुरुवात झाली होती. मुंबईकरांनी मात्र वर्धक मात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

लसीकरणाचे चित्र..

* मुंबईत महापालिका व शासकीय रुग्णालयांत ९४, तर खासगी रुग्णालयांत १२५ अशी एकूण २१९ कोविड-१९ लसीकरण केंद्रे सध्या कार्यान्वित

* मुंबईतील १८ वर्षांवरील १ कोटी ८ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली. तर ९७ लाख ९९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

* करोनाची वर्धक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहे. यामध्ये फक्त आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे (फ्रंटलाइन) कर्मचारी त्याचप्रमाणे ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिकांनाच महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत प्रतिबंधात्मक मात्रा

* १८ वर्षांवरील इतर सर्व पात्र नागरिकांना १० एप्रिल २०२२ पासून खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे १५ जुलैपर्यंत केवळ ९ लाख ९२ हजार १७७ (१२ टक्के) एवढय़ा लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस)

* ३० सप्टेंबपर्यंत १४ लाख २९ हजार ७८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. म्हणजेच १५ जुलैपासून सुरू झालेल्या लस अमृत महोत्सवाच्या ७५ दिवसांच्या कालावधीत केवळ साडेचार लाख नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली.

* सध्या शहरातील ७८ लाख नागरिक वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत, मात्र करोनाचा नियंत्रणात असल्यामुळे नागरिकांनी या मात्रेकडे पाठ फिरवली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special covid vaccination drive get low response in mumbai zws