राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढत आहेत. मनी लॉन्डिरग प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीतून दिलासा मिळालेला नाही. विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिकांनाला ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून त्यांना ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि त्याच दिवशी त्यांना आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांची प्रदीर्घ चौकशी झाली. चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.
अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक यांच्यावर हसिना पारकर यांच्या मालकीची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांनी ३०० कोटींची जमीन केवळ ५५ लाखांना खरेदी केल्याचा आरोपही आहे. या संपूर्ण व्यवहारात मलिक यांच्यावर मनी लॉन्डिरगचा आरोप आहे. यासोबतच अंडरवर्ल्ड आणि १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध असून मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप आहे. ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केला आहे.
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आहे.