मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नुकतीच पाच हजार विद्युत बस दाखल झाल्या असून या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मात्र, यावेळी शिंदे यांनी एसटी आगारांच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच तत्काळ राज्यातील एसटी आगार, बस स्थानकांची स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिले.
त्यानंतर एसटी महामंडळाने संपूर्ण मार्च महिन्यात राज्यातील एसटी आगारातील प्रसाधनगृहांची स्वच्छता पाहण्यासाठी विशेष तपासणी मोहीम आखली आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणाऱ्या आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिले आहेत. एसटी आगारांच्या स्वच्छतेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून ६०० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांपासून काम सुरू आहे. परंतु ठाण्यामधील खोपट एसटी स्थानकातील असुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारून समस्येचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा – भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
राज्यभरातील सुमारे ५४ लाख प्रवासी दररोज एसटीने प्रवास करतात. एसटी आगार, बस स्थानकांतील प्रसाधनगृहात स्वच्छता असावीत अशी अपेक्षा या प्रवाशांना असते. मात्र, प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्याबद्दल प्रवासी वारंवार एसटी महामंडळाकडे तक्रारी करीत असतात. परिणामी, प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत १ ते ३१ मार्चदरम्यान विशेष स्वच्छता तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यातील सर्व प्रसाधनगृहाना भेटी देणार आहेत. यावेळी प्रसाधनगृहे अस्वच्छ दिसल्यास संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करून त्या संस्थेचा ठेका रद्द करण्यात येणार आहे. तसेच त्यांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महामंडळातर्फे सुविधा उपलब्ध करण्यात येत असलेल्या प्रसाधनगृहात कोणतीही त्रुटी आढळल्यास आगार व्यवस्थापकावर शिस्त व अपील कार्यपध्दतीनुसार कारवाई करण्यात येईल, अशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत.