३१ डिसेंबरच्या रात्री ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी पूर्व उपनगरांमधून दक्षिण मुंबईत येणाऱ्या लोकांना घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी मध्य रेल्वेने एका दिवसासाठी तीन विशेष फेऱ्या मुंबईहून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन विशेष फेऱ्यांच्या जोडीला मुंबईकडे येणारी गर्दी लक्षात घेऊन कल्याण, ठाणे आणि पनवेल येथूनही मध्य रेल्वे विशेष फेऱ्या सोडणार आहे. उशीरा घरी जाणाऱ्या ‘उत्साहीं’साठी विशेष सेवा पुरविण्यात पश्चिम रेल्वे आणि ‘बेस्ट’ही मागे राहिल्या नाहीत.
मुंबईतील बहुतांश लोक ३१ डिसेंबरची रात्र साजरी करण्यासाठी दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया अशा ठिकाणी गर्दी करतात. रात्री बारानंतर घरी परतण्यास सुरुवात होते. अशांसाठी मध्य रेल्वेने सहा विशेष फेऱ्या सोडण्याचे ठरवले आहे.
या फेऱ्यांपैकी तीन फेऱ्या कल्याण, ठाणे आणि पनवेल या स्थानकांवरून अनुक्रमे १२.४५, १.३५ आणि १.०० वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होतील. तर मुंबईतील गर्दीला घरी पोहोचवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून ठाणे, कल्याण आणि पनवेलच्या दिशेने तीन फेऱ्या रवाना होतील. या फेऱ्या अनुक्रमे २.००, २.३० आणि २.१५ वाजता निघतील.
‘बेस्ट’चाही दिलासा
‘थर्टी फस्ट’ साजरा करण्यासाठी जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया अशा ठिकाणी तसेच समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या नागरीकांना ‘बेस्ट’ने दिलासा दिला आहे. रात्री ११ वाजल्यापासून या १५ जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेचीही विशेष सेवा
३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनमध्ये शेवटची गाडी चुकण्याच्या भीतीने व्यत्यय येवू नये याची काळजी पश्चिम रेल्वेनेही घेतली आहे. चर्चगेट ते विरार या मार्गावर ३१ डिसेंबरच्या रात्री एकूण ८ विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. चर्चगेट येथून रात्री १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० वाजता अशा चार विरार लोकल सोडल्या जातील. तर, विरारहून रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि २.५५ वाजता चर्चगेटकडे गाडय़ा सोडल्या जातील.

Story img Loader