वीजचोरी आणि विजेचे पैसे थकवल्याच्या कारणास्तव २५ टक्के महाराष्ट्रात भारनियमन असल्याने या भागात वीजचोरीविरोधात आणि वीजदेयकांच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ विशेष मोहीम हाती घेणार आहे. त्याअंतर्गत थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडताना त्यांचे मीटर आणि तेथील तारा काढून आणण्याचा आदेश राज्यभरातील कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
राज्यात औद्योगिक ग्राहकांना फेब्रुवारी २०१२ पासून आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास वीज दिली जात आहे. वीजचोरी व थकबाकीच्या प्रमाणानुसार शहरी भागात ४२ टक्क्यांपर्यंत आणि ग्रामीण भागात ४५ टक्क्यांपर्यंत वीजहानी असलेल्या ड गटापर्यंतचे एकूण ३७७२ फीडर भारनियमनमुक्त झाले आहेत. तर ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या भागातील १२७० फीडरवर अद्याप भारनियमन सुरू आहे. ग्राहकांपर्यंत वीज नेण्यासाठी प्रति युनिट पाच रुपये खर्च येत असताना या जादा वीजहानीच्या भागांत प्रति युनिट एक रुपयापेक्षाही कमी वसुली होते. परिणामी राज्यातील ७५ टक्के भाग भारनियमनमुक्ततर २५ टक्के महाराष्ट्र अजूनही अंधारात अशी परिस्थिती आहे.
आता या २५ टक्के भागातील वीजचोऱ्या नियंत्रणात आणण्याची आणि वीजदेयक वसुली वाढवण्याचे आव्हान ‘महावितरण’ने स्वीकारले आहे. त्यानुसार भारनियमनग्रस्त भागातील वीजचोरी आणि थकबाकीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडताना केवळ मीटरच्या तारा काढल्या जायच्या. त्यात कनिष्ठ पातळीवरील कर्मचारी बऱ्याचदा कंपनीची फसवणूक करायचे. आता अशी कारवाई करताना विजेचे मीटर आणि तेथील तारा काढून ‘महावितरण’च्या कार्यालयात जमा करण्याचा आदेश राज्यभरातील कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच पैसे भरणाऱ्या थकबाकीदारांना तातडीने वीजजोडणी देण्यासही सांगण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे भारनियमनग्रस्त भागांतील वीजचोऱ्या आणि थकबाकी कमी होईल व ती नियंत्रणात आल्यावर संबंधित भाग भारनियमनमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.

Story img Loader